दाभोळ येथील ‘रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा. लि.’ या प्रकल्पातील वीजनिर्मिती वायुपुरवठय़ाअभावी जवळपास बंदच असल्याने वीजविक्रीतून मिळणारा महसूल बंद होऊन १३ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पावर आर्थिक संकटाचे ढग गोळा होण्यास सुरुवात झाली असून वीजनिर्मिती अशाच रीतीने बंद राहिली, तर आर्थिक कारणांमुळे या प्रकल्पाला पुन्हा एकदा टाळे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.
दाभोळ वीज प्रकल्पाची क्षमता १९५० मेगावॉट आहे. पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प चालण्यासाठी दररोज ८.५ दशलक्ष घनमीटर वायूची गरज असते. त्यातील ७.६ दशलक्ष घनमीटर वायू मुकेश अंबानी यांच्या ‘रिलायन्स’च्या ताब्यातील कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील वायू प्रकल्पातून अपेक्षित आहे, तर बाकीचा ०.९ दशलक्ष घनमीटर वायू हा ‘ओएनजीसी’मार्फत मिळणे अपेक्षित आहे. कृष्णा-गोदावरील खोऱ्यातील वायूचा पुरवठा गेल्या दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने कमी झाला. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी सरासरी १६०० मेगावॉट वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पातील वीजनिर्मिती कमीकमी होत गेल्या काही महिन्यांत केवळ सरासरी २५० ते ३०० मेगावॉटपर्यंत घटली. त्यानंतर गेल्या काही दिवसांत तर पाच-सात मेगावॉटपर्यंत हे प्रमाण खाली आले, तर काही वेळा तर वायूअभावी वीजनिर्मितीच बंद राहिली. शनिवारी २० मेगावॉटपर्यंत वीजनिर्मिती होत होती.
‘एन्रॉन’ बंद पडल्यावर या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी भारतीय कंपन्यांनी तीन हजार कोटींचे भागभांडवल घातले. त्यात ‘एनटीपीसी’चा वाटा ३२.४७ टक्के, ‘गेल’चा वाटा ३२.४७ टक्के, महाराष्ट्र वीजमंडळाचा वाटा १६.९४ टक्के, तर आयडीबीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँकसारख्या वित्तीय संस्थांचा वाटा १८.१२ टक्के आहे, तर १० हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले. अशा रीतीने तब्बल १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून मोठय़ा आशेने हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता, पण गेल्या काही काळात वायूअभावी वीजनिर्मिती जवळपास ठप्प असल्याने या वीज प्रकल्पाच्या भांडवली खर्चाचा बोजाही वसूल होत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या वीज प्रकल्पातील ९५ टक्के वीज ‘महावितरण’ घेते. प्रकल्प एक तृतीयांश क्षमतेने सुरू असताना साधारणपणे महिन्याला ३०० ते ४०० कोटी रुपये महसूल ‘महावितरण’ वीजखरेदीपोटी ‘आरजीपीपीएल’ कंपनीला देत होती. फेब्रुवारीपासून वीजनिर्मिती जवळपास ठप्प असल्याने ‘महावितरण’ने पैसे देण्याचे थांबवले. त्यामुळे वीज कंपनीचा उत्पन्नाचा मार्गच बंद झाला. त्यामुळे या वीज प्रकल्पातून नफा होणे तर दूर, मुळात भांडवली खर्च निघणेही कठीण झाल्याने प्रकल्प आर्थिक संकटात सापडत आहे. लवकरात लवकर यातून मार्ग निघाला नाही तर दाभोळ प्रकल्पाला आर्थिक प्रश्नामुळे कुलूप लावण्याची वेळ येऊ शकते, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

७५० कोटी युनिट विजेचा तोटा
गेल्या दोन वर्षांत अल्प वायू मिळत असल्याने दाभोळ वीज प्रकल्पातील वीजनिर्मिती घटली. या दोन वर्षांच्या कालावधीत केवळ वायूच्या टंचाईमुळे दाभोळ प्रकल्पातील वीजनिर्मिती ७५० कोटी युनिटने घटली. त्यामुळे प्रकल्पाच्या आर्थिक उत्पन्नावर साहजिकच परिणाम झाला.