आधीच तुटपुंजे वेतन आणि त्यात ५० टक्के कपात यामुळे कायमस्वरूपी, हंगामी व रोजंदारीवरील एसटी कर्मचाऱ्यांना बँकेचे कर्ज, भविष्य निर्वाह निधीची रक्कम कापून हातात येणाऱ्या पैशात घरखर्च भागवणेही कठीण होणार आहे. त्यामुळे रात्रीचा दिवस करून परप्रांतीय आणि अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटी चालक-वाहकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

एसटी महामंडळात एक लाखाहून अधिक कर्मचारी, अधिकारी आहेत. टाळेबंदी काळात एसटीच्या चालक-वाहकांनी लाखो परप्रातीयांना राज्याच्या सीमेपर्यंत, तर काहींना त्यांच्या राज्यापर्यंत नेऊन सोडले. शिवाय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक सेवा उपलब्ध करून दिली. उत्पन्नाचे कारण देत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५० टक्के कपात करण्यात येत आहे. राज्याकडून मिळालेल्या सवलतीच्या रकमेवर गेल्या तीन महिन्यांचे वेतन दिले. मात्र आता हे पैसे येणार नसल्याने वेतन देता येणार नसल्याचे कारण महामंडळाकडून दिले जात आहे. एसटीचे अनेक वरिष्ठ अधिकारी टाळेबंदी काळात घरी होते. चालक-वाहक मात्र जिवावर उदार होऊन सेवा बजावत होते. त्यांना वेतन देताना एसटीने हात आखडता घेतल्याने नाराजी आहे.

घरखर्च भागविण्याची चिंता

२०१८ पासून भरती झालेल्या ३० हजारांपेक्षा जास्त चालक, वाहक, लिपिक, टंकलेखक, साहाय्यक यांना के वळ २० हजारापर्यंत वेतन आहे. हंगामी वेतनश्रेणीवरील कर्मचाऱ्यांची संख्या १० ते १५ टक्के आहे. काहीजण रोजंदारीवर काम करतात. त्यांना अगदीच कमी वेतन मिळते. या सर्व कर्मचाऱ्यांवर वेतन कपातीची कुऱ्हाड कोसळली आहे. बँकेचे कर्ज, भविष्य निर्वाह निधी, विमा कापून अनेकांच्या हाती तुटपुंजी रक्कम येते. त्यात ५० टक्के कपातीमुळे घरखर्च भागवणेही कठीण होणार आहे.