टोळीने फसवलेल्या तरुणांचा आता क्रिकेटला कायमचा रामराम

आयपीएल किंवा रणजी स्पर्धेतील संघांत स्थान मिळवून देण्याचे आमिष दाखवून गरीब, मध्यमवर्गीय तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीच्या कृत्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. आपली मुले स्पर्धात्मक क्रिकेट खेळू लागली की, चांगला पैसा कमवतील व उज्ज्वल भविष्य निर्माण करतील, या आशेने अनेक कुटुंबांनी आपली जमीन, घर, दागिने विकून वा गहाण ठेवून हा पैसा उभा केला. पण फसवणूक झाल्याने त्यांच्या पदरी निराशा आणि समोर कर्ज फेडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यातच परिचितांकडून होणारी थट्टा, टोमणे यांमुळे या मुलांनी क्रिकेट खेळणे तर दूरच हातात बॅट धरणेही सोडून दिले आहे.

आयपीएल, रणजी या स्पर्धात खेळण्याची संधी मिळवून देतो, असे सांगून विजय बराते आणि त्याच्या टोळीने मुंबईसह विविध शहरांतील २२ युवा क्रिकेटपटूंकडून  लाखो रुपये उकळले. यातील बहुतांश मुले ही गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांतील आहेत. मात्र, मुले स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये खेळल्यास चांगले नाव व पैसा कमवतील, या आशेने या कुटुंबांनी हा पैसा उभा केला. आयपीएलसाठी प्रयत्नशील असलेल्या विद्यार्थ्यांचे वडील किरकोळ कंत्राटदार आहेत. मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी आधी उत्तर प्रदेश येथील मूळ गावी असलेली जमीन विकली. व्याजाने पैसे घेतले आणि २० लाख रुपये बरातेला दिले. त्यानंतर बरातेने पुन्हा दोन दिवसांत १० लाख रुपये द्या, नाहीतर सगळी मेहनत वाया जाईल, असे सांगितले. तेव्हा या कुटुंबाने धारावीतील राहते घरही गहाण ठेवून दोन दिवसांत दहा लाख रुपये उभे केले.  अन्य एका खेळाडूचे वडील अंडीविक्रीचा व्यवसाय करतात. बदलापूर येथे घरासाठी त्यांनी चार लाख रुपये गुंतवले होते. मुलासाठी त्यांनी ते परत घेतले. तसेच पत्नीचे दागिने गहाण ठेवून ७ लाख रुपये बरातेला दिले. एका खेळाडूला वडील नाहीत. आई वयस्कर व आजारी असल्याने थोरल्या भावावर कुटुंबाचा भार. ‘एमआर’ असलेल्या थोरल्या भावाने आणि त्याच्या अन्य नातेवाईकाने कर्ज काढून, व्याजाने पैसे घेऊन बरातेने मागितलेली रक्कम गोळा केली.

बरातेकडून फसवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर या मुलांसमोर आता भवितव्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहेच; पण आयुष्यात जे क्रिकेट या मुलांचे सर्वकाही बनले होते, तो खेळच त्यांना नकोसा वाटू लागला आहे. ‘आयपीएलमध्ये खेळणार, रणजी संघात निवड होणार ही आनंदवार्ता आमच्या मित्रपरिवारात, परिसरात पसरली. पण घडले भलतेच. त्यानंतर थट्टा, टोमणे सुरू झाले. आधीच परिस्थिती बेताची होती. त्यातही शक्य त्या खटपटी करून पालकांनी पैसे उभे केले. ते पुन्हा मिळतील का याची हुरहुर पाठ सोडत नाही. बॅट हातात घेतली तरी फसवणूक आठवते. त्यामुळे मी क्रिकेटचा नादच सोडला,’ असे एका खेळाडूने सांगितले.

लक्ष्मणच्या नावाने दूरध्वनी

गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने केलेल्या तपासातून बराते आणि त्याच्या टोळीचे धक्कादायक कारनामे उघड होत आहेत. आझाद मैदान येथे क्रिकेट क्लब चालवणाऱ्या श्रीकांत घोलप यांना बराते व टोळीने गाठले. घोलप यांच्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्या आठ खेळाडूंच्या पालकांची या टोळीने एकत्रित बैठक घेतली. त्यात आसाम, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि हैद्राबाद या चार राज्यांमधील रणजी संघात स्थान मिळवून देतो, आयपीएलमधील सनरायझर्स हैद्राबाद संघात निवड करून देतो, असे आमिष दाखवले. या बैठकींमध्ये टोळीने माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणला फोन केल्याचे भासवत या खेळाडूंच्या निवडीबाबत चर्चा केली. मुळात हा फोन लक्ष्मण यालाच केला गेला की त्याच्या नावाचा वापर करून पालकांवर प्रभाव टाकला गेला, याचा तपास पोलीस करत आहेत. रणजीसाठी टोळीने घोलप यांच्या क्लबमधील खेळाडूंकडून आधी चार व नंतर डेव्हलपमेन्ट कॅम्पच्या नावाखाली सव्वातीन लाख रुपये उकळले. तर आयपीएलसाठी एका खेळाडूकडून ३० लाख रुपये स्वीकारले. त्यानंतर तुमच्या मुलांमध्ये प्रावीण्य नाही, त्यामुळे त्यांची निवड होऊ शकली नाही, असे सांगून बराते आणि टोळीने हात वर केले.

प्रशिक्षकांनाही फटका

या मुलांचेच नाही तर त्यांच्या प्रशिक्षकांनाही त्याचा मनस्ताप सोसावा लागतो आहे. ‘या सर्व मुलांचे आणि माझे करिअर उद्ध्वस्त झाले. बराते आणि टोळीशी संपर्क होण्याआधी माझ्याकडे ४० खेळाडू होते. त्यातल्या २२ जणांनी क्रिकेट सोडले. उरलेल्यांनी माझा क्लब सोडला. या फसवणुकीनंतर मीही क्लब सुरू करण्याची हिंमत करू शकलो नाही. पूर्व उपनगरातल्या एका शाळेच्या संघाला प्रशिक्षण देतो आणि क्रिकेटचे साहित्य विकून उदरनिर्वाह करतो,’ असे प्रशिक्षक घोलप यांनी सांगितले.

मुंबईतून आणखी आठ तक्रारी

बराते व टोळीच्या अटकेची माहिती मिळताच मुंबईच्या भांडुप, सांताक्रूज आणि अन्य भागांतून आणखी आठ युवकांची तक्रार समोर आल्याचे गुन्हे शाखेतून सांगण्यात आले. याव्यतिरिक्त दिल्ली, उत्तर प्रदेश, कोचीन या भागांतील खेळाडूही बरातेविरोधातील तक्रारी करत आहेत. काहींनी फोनवरून तर काहींनी ईमेलवरून फसवणुकीची माहिती, पुरावे गुन्हे शाखेला धाडले आहेत.