दोन वर्षे उलटूनही निधीअभावी रखडलेल्या एमयूटीपी-३ मधील प्रकल्पांना ३,५०० कोटी रुपयांचे आर्थिक बळ मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि कर्जपुरवठा करणाऱ्या एशियन इन्फ्रास्ट्रक्चर बँक (एआयबी) यांच्या प्रकल्पांसाठी निधी देण्यासंदर्भात बैठक सुरू होत्या. या बैठक यशस्वी झाल्या असून बँकेने सहमती दर्शवल्याची माहिती एमआरव्हीसीकडून देण्यात आली.

एमआरव्हीसीकडून मध्य व पश्चिम रेल्वेवर एमयूटीपीअंतर्गत (मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट) विविध प्रकल्प राबविले जात आहेत. एमयूटीपी-३ ला डिसेंबर २०१६ मध्ये मंजुरी मिळाली आहे. यामध्ये ४७ वातानुकूलित लोकल, पश्चिम व मध्य रेल्वेवर दोन स्थानकांत रुळ ओलांडण्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना, विरार-डहाणू चौपदरीकरण, पनवेल-कर्जत दुहेरीकरण व ऐरोली ते कळवा उन्नत मार्ग या प्रकल्पांचा समावेश आहे.  या प्रकल्पांसाठी कर्ज मिळवण्यासाठी जागतिक बँकेबरोबर चर्चा होत होती. मात्र मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी एक स्वतंत्र संस्था, पनवेल ते कर्जतऐवजी प्रथम एमयूटीपी-३ ए मधील पनवेल ते विरार उपनगरीय मार्गाला कर्ज दिले जाईल, अशा अटींवर साधारण दीड वर्ष सुरू असलेली चर्चा फिस्कटली आणि कर्ज देणाऱ्या जागतिक बँकेने यातून माघार घेतली.

त्यानंतर एमआरव्हीसीने दुसऱ्या बँकांशी चर्चा सुरू केली. ३,५०० हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेन्ट बँकेबरोबर बोलणी सुरू होती आणि बँकेने कर्ज देण्यासाठी सहमतीही दर्शवली. मात्र कर्ज हवे असल्यास तीन प्रकल्पांतील ५० टक्के भूसंपादन करा, तरच कर्ज मिळेल, अशी अट बँकेने ठेवली.

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वाटाघाटीत भूसंपादन सुरू असून ही कामे वेळेतच पूर्ण होतील, असे एमआरव्हीसीने बँकेला पटवून दिले. तर विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत दुहेरीकरण या प्रकल्पांसाठी आधी काढलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने दुसऱ्यांदा निविदा लवकरच काढा, अशीही बँकेने अट घातली. याबद्दल एमआरव्हीसीने दिलेले आश्वासन व अन्य तांत्रिक मुद्दय़ांवर यशस्वी झालेल्या चर्चेअंती एआयबीने कर्ज देण्यास सहमती दर्शवल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.  सर्व एमयूटीपी प्रकल्पांसाठी गेल्या अंतरिम अर्थसंकल्पात ५७९ कोटी रुपये मंजूर झाले होते. यात २८४ कोटी रुपये एमयूटीपी-३ साठी आहेत.

एमयूटीपी-३ मधील प्रकल्पांसाठी लागणारा खर्च

* विरार ते डहाणू चौपदरीकरण- ३ हजार ५७८ कोटी रुपये

* पनवेल ते कर्जत दुहेरीकरण- २ हजार ७८३ कोटी रुपये

* ऐरोली ते कळवा उन्नत मार्ग- ४७६ कोटी रुपये

* ४७ वातानुकूलित लोकल- ३ हजार ४९१ कोटी रुपये

* रूळ ओलांडणे रोखण्यासाठी उपाययोजना- ५५१ कोटी रुपये

* अन्य तांत्रिक कामे- ६९ कोटी रुपये