News Flash

कुत्र्यांची विष्ठा साफ न केल्यास मालकाला दंड

दंड आकारण्यापूर्वी जनजागृती करणे गरजेचे असल्याने कुत्र्यांच्या मालकांना याबाबत माहिती देण्यात येत आहे.

आधी जनजागृती, मग दंडवसुली; मरिन ड्राइव्हनंतर शहरात इतरत्रही मोहीम राबविणार

पाळीव कुत्र्यांना फिरवण्याची हौस असणाऱ्यांना त्यांच्यामुळे अस्वच्छता होणार नसल्याचीही काळजी यापुढे घ्यावी लागणार आहे. सध्या मरिन ड्राइव्हवर महानगरपालिकेच्या क्लीन-अप मार्शलकडून जनजागृती करण्यात येत असून पुढील आठवडय़ानंतर मात्र कुत्र्यांना फिरायला आणून त्यांची विष्ठा न उचलणाऱ्यांकडून ५०० रुपयांची दंडवसुली करण्यात येणार आहे. मुंबईतील बहुतेक समुद्र किनाऱ्यांवर हा त्रास जाणवत असून मरिन ड्राइव्हनंतर इतरही ठिकाणी ही मोहीम राबविली जाणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्या मुंबईकरांना लगाम घालण्यासाठी महानगरपालिकेने ऑगस्टपासून प्रत्येक वॉर्डमध्ये ३० मार्शलची नेमणूक केली आहे. रस्त्यांवर थुंकणे, लघवी करणे, कचरा टाकणे, शौचास बसणे तसेच कचराकुंडी न ठेवलेल्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे अधिकार क्लीन अप मार्शलला देण्यात आले असून त्यासाठी १०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येतो. पाळीव प्राण्यांकडून रस्त्यावर विष्ठा झाल्यास संबंधित मालकाला ५०० रुपये दंड करण्याची तरतूद आहे. मात्र गेल्या तीन महिन्यात याबाबत कडक कारवाई करण्यात आलेली नाही. पण मरिन ड्राइव्हचा परिसर पाळीव कुत्र्यांमुळे अस्वच्छ होत असल्याच्या तक्रारी पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केल्या. संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांनी या तक्रारी वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर मरिन ड्राइव्ह येथील क्लीन अप मार्शलना सूचना देण्यात आल्या. पाळीव कुत्र्यांकडून अस्वच्छता पसरत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. दंड आकारण्यापूर्वी जनजागृती करणे गरजेचे असल्याने कुत्र्यांच्या मालकांना याबाबत माहिती देण्यात येत आहे. त्यानंतर पुढील आठवडय़ापासून दंडात्मक कारवाई केली जाईल, असे सी वॉर्डचे साहाय्यक आयुक्त जीवक घेगडमल यांनी सांगितले.

मरिन ड्राइव्हप्रमाणेच चौपाटी असलेल्या वरळी येथे मात्र कुत्र्याच्या विष्ठेचा त्रास होत नसल्याचे जी दक्षिण वॉर्डच्या साहाय्यक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे म्हणाल्या. या चौपाटीवर कुत्र्यांना घेऊन फेरी मारायला येणाऱ्यांकडे प्लास्टिकची पिशवी असते व कुत्र्याने विष्ठा केल्यास तातडीने साफ करून आजुबाजूच्या कचऱ्याकुंडय़ांमध्ये टाकली जाते. मात्र स्वतच्या पाळीव कुत्र्यांची विष्ठा न उचलणाऱ्यांना दंड आकारणे योग्य आहे, असे कापसे यांनी सांगितले. कुत्र्यांची विष्ठा साफ न करणाऱ्या मालकांकडून दंड आकारण्याचा निर्णय घेऊन क्लीन अप मार्शलना त्या प्रकारे सूचना देण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे. अर्थात क्लीन अप मार्शलकडून आकारण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या दंडांमध्ये तशी तरतूद आधीच आहे, त्यामुळे मुंबईत इतरत्रही हा दंड आकारता येईल, असे घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

दंड आकारणी

  • रस्त्यावर शौचास बसणे १०० रुपये
  • कचरा टाकणे, थुंकणे, लघवी करणे, कपडे किंवा भांडी धुणे २०० रुपये
  • पाळीव प्राण्यांकडून रस्त्यांवर घाण होणे, कचराकुंडी न ठेवलेला दुकानदार ५०० रुपये
  • गाडी धुणे, मांसमच्छीचा कचरा वेगळा न करणे १००० रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 2:52 am

Web Title: fine for dog potty if not clean
Next Stories
1 पालिकेकडून आणखी आठ रात्रनिवारे
2 नवउद्य‘मी’ : जाहिरातीचे डिजिटल ‘तंत्र’
3 सारासार : घर का भेदी
Just Now!
X