अभिनेत्री प्रीती झिंटाने उद्योजक नेस वाडियावर विनयभंगाची केस केली आहे. हे चार वर्षे जुने प्रकरण आहे. जर नेस वाडिया माफी मागण्यास तयार असेल तर आपण केस मागे घेऊ असं अभिनेत्री प्रीती झिंटाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं. मात्र नेस वाडिया माफी मागणार नाहीत असं वाडियांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. प्रीती झिंटा फक्त मीडियाचं लक्ष वेधण्याच्या तयारीत आहे असा आरोप वाडियाचे वकील आभात फोंडा यांनी केला आहे.

आम्हाला लेखी माफीची अपेक्षा नाही, असं प्रीतीच्या वकिलांनी स्पष्ट केलं. ‘झालं तेवढं पुरे झालं, आता हे प्रकरण सामोपचाराने मिटवा’ असं मत न्या. रणजीत मोरे यांनी व्यक्त केलं. एवढंच नाही तर नेस वाडिया आणि प्रीती झिंटा या दोघांनाही पुढच्या सुनावणीसाठी हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पुढच्या मंगळवारी म्हणजे ९ ऑक्टोबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

३० मे २०१४ रोजी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन संघांदरम्यान आयपीएलचा सामना सुरु होता. त्यावेळी आपल्याला वानखेडे मैदानाच्या गरवारे पॅव्हेलियनमध्ये बसलेलं पाहून नेस वाडियाने तिकीट वाटपावरून आपल्या टीमच्या कर्मचाऱ्यांच्या देखत शिवीगाळ केली. त्यानंतर मी जागा बदलली. मात्र त्याने नेसचे समाधान झाले नाही. त्याने टीम सदस्यांच्या देखत पुन्हा आपल्याला शिवीगाळ करत असभ्य वर्तन केलं आणि हात जोरात खेचला असं प्रीती झिंटाने म्हटलं आहे. मात्र हे सगळे आरोप नेस वाडियाने फेटाळून लावले आहेत.