मुंबई : करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पवईतील एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेच्या एल विभाग कार्यालयाने ही कारवाई केली आहे. प्रतिबंधित करण्यात आलेल्या मजल्यावर ही महिला राहत होती. मात्र प्रतिबंधित कालावधी संपण्याच्या आतच ही महिला मुंबईबाहेर गेली असल्याचे आढळून आले आहे. तसेच तिच्या घरी काम करणारी महिला कुत्र्याला घेऊन रोज सायंकाळी फिरायला जात असल्याचेही आढळून आले.

मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने सर्वच निर्बंध आता कडक के ले आहेत. नियमांचे पालन न केल्यामुळे पालिकेने एका महिलेविरोधात गुरुवारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल के ली आहे. पवई येथील एव्हरेस्ट हाइट या इमारतीतील एक रहिवासी करोनाबाधित झाले होते. १४ फे ब्रुवारीला त्यांचा अहवाल आला होता. त्यामुळे ते राहत असलेला मजला पालिकेच्या एल विभागाने प्रतिबंधित केला. या मजल्यावरील अन्य रहिवाशांनाही कोणीही वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर जाऊ नये, असे सांगण्यात आले होते. तशा सूचना सोसायटीच्या व्यवस्थापक आणि सचिवांना देण्यात आल्या होत्या. तसेच या मजल्यावर तसा फलकही लावण्यात आला होता, अशी माहिती एल विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र जाधव यांनी दिली.

दरम्यान, १७ फेब्रुवारीला पालिकेचे पथक पाहणीसाठी गेले असता रुग्णाच्या मजल्यावर राहणारी कामिया वर्मा ही महिला प्रतिबंधित क्षेत्राचे नियम धुडकावून परवानगी न घेताच मुंबईबाहेर गेल्याचे आढळून आले. ही महिला गुरुवारीही परतली नव्हती, असे या पथकाला समजले. त्यामुळे अखेर या पथकाने तिच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब अन्वये व साथरोग नियंत्रण कायद्यान्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या महिलेच्या घरी काम करणारी महिला दररोज सायंकाळी कुत्र्याला फिरवण्यासाठी ये-जा करीत असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘नागरिकांनी सहकार्य करावे!’

नागरिकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे मुंबईत करोनाचे रुग्ण वाढत असून संसर्गाचा धोका वाढत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेऊन करोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत लोकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे  असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांनी के ले आहे. नाहीतर नाईलाजास्तव आम्हाला कारवाई करावे लागते, असेही ते म्हणाले.