मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही निदरेषत्व नाही; अनेक तरुणांच्या परदेशातील शिक्षण, रोजगार संधींवर गदा

नमिता धुरी, लोकसत्ता

मुंबई : आरेतील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेला एक वर्ष लोटले तरीही अद्याप हे गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गुन्हे दाखल असलेल्या पर्यावरण कार्यकर्त्यांच्या परदेश प्रवासात अडचणी येत आहेत.

ऑक्टोबर २०१९ मध्ये ‘मेट्रो ३’च्या कारशेडसाठी आरेतील झाडे कापण्यात येत असताना पर्यावरणप्रेमी तरुणांनी उत्स्फूर्तपणे पुकारलेल्या आंदोलनातून २९ जणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

डिसेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आरेमधील कारशेड रद्द करून आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची  घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. एक वर्ष लोटले तरी अद्याप हे गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत.

‘त्या रात्री २-३ वाजताच्या सुमारास आंदोलकांना ताब्यात घेऊन आरे पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते. सकाळी गुन्हा दाखल करून त्यांना ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी जामिनावर त्यांची सुटका झाली. परंतु, त्यांना दर रविवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागत होती,’ अशी माहिती आकाश पाटणकर यांनी दिली. गुन्हा दाखल असल्याने आकाश यांना चित्रपटनिर्मिती क्षेत्राशी संबंधित परदेशातील एका संधीला मुकावे लागले.

‘आम्ही गुन्हा केलेलाच नाही, मग पारपत्राच्या अर्जामध्ये आमच्यावर दाखल असलेले गुन्हे का लिहावेत,’ असा प्रश्न आंदोलक स्वप्ना स्वार यांनी उपस्थित केला. ‘महिला आंदोलकांना भायखळा येथील कारागृहात ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला. परंतु हातात पाटी घेऊन गुन्हेगारांप्रमाणे छायाचित्रे काढणे, हातांचे ठसे घेणे हे पर्यावरण कार्यकर्ती म्हणून मानसिकदृष्टय़ा त्रासदायक आहे,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

स्वप्निल पवार यांनाही शिक्षण आणि नोकरीनिमित्त परदेशी जायचे होते; मात्र गुन्हा दाखल असल्यामुळे जाता आले नाही.

याबाबत आरे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नूतन पवार यांना विचारले असता या प्रकरणाबाबतचा अहवाल दिंडोशी न्यायालयाला सादर केल्याची माहिती त्यांनी दिली.

आंदोलनाची पाश्र्वभूमी

‘आरेतील वृक्षतोडीबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने वृक्षतोडीला तात्पुरती स्थगिती देण्याची तोंडी सूचना उच्च न्यायालयाने केली होती. तसेच पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने वृक्षतोडीस परवानगी दिल्यानंतर नागरिकांना हरकती नोंदवण्यासाठी १५ दिवसांची मुदत मिळणे आवश्यक होते. तसे न करता प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यानंतर लगेचच ४ ऑक्टोबरच्या संध्याकाळी आरेतील वृक्षतोडीस प्रारंभ झाला. याबाबतची माहिती मिळताच मुंबईच्या कानाकोपऱ्यांतून पर्यावरणप्रेमी तेथे जमले,’ अशी माहिती ‘आरे वाचवा चळवळी’तील जोरू बाथेना यांनी दिली. कारशेडच्या बाहेर पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू क रताच आरेमध्ये येण्या-जाण्याचे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले व २९ आंदोलकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.