वांद्रे येथील जुलैमध्ये आग लागलेल्या केनिलवर्थ शॉपिंग सेंटरची (केएफसी मॉल)ची अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पाहणी केली. या मॉलमधील एका दुकानात अनधिकृतपणे पाच गॅस सिलिंडर आढळून आल्यामुळे अग्निशमन दलाने मॉलविरुद्ध खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला.
वांद्रे येथील केएफसी मॉलला २१ जुलै रोजी आग लागली होती. या आगीनंतर केलेल्या पाहणीत मॉलमधील अग्निशमन यंत्रणेबाबत त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे अग्निशमन दलाने मॉलवर नोटीस बजावली होती. मॉलमध्ये अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या की नाहीत याची मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास अग्निशमन दलाचे साहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी एस. के. बंडगर यांनी पाहणी केली. त्या वेळी मॉलमधील एफ-१६ क्रमांकाच्या दुकानात पाच गॅस सिलिंडर आढळून आले. त्यापैकी चार गॅस सिलिंडर भरलेले होते. ते जप्त करून पालिकेच्या ताब्यात देण्यात आले.