स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँँच्या विरोधात दाखल झालेल्या हुंडाबळीच्या गुन्ह्याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले असून चार जणांचे जबाब नोंदविले आहेत.
सासरच्या कुटुंबीयांकडून आपला शारीरिक आणि मानसिक छळ होत असून त्याला आध्यात्मिक धर्मगुरू सुखविंदर कौर ऊर्फ राधे माँँ जबाबदार असल्याचा आरोप निक्की गुप्ता या विवाहितेने करून तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी नुकतीच राधे माँँसह सात जणांवर हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आम्ही आरोपींचे जबाब नोंदवीत असून पुरावे गोळा करत आहोत, असे कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी सांगितले. आठवडय़ाभरात जबाब नोंदवून पुढील कारवाई केली जाईल, असेही पवार यांनी सांगितले. या प्रकरणात राधे माँँ सात क्रमांकाची आरोपी आहे.या प्रकरणी राधे माँ यांचे सहकारी संजीव गुप्ता, टिल्ली महाराज आणि प्रवक्ते जगमोहन यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी वारंवार दूरध्वनीद्वारे तसेच एसएमएसद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
दरम्यान, गुरुवारी फोर्ट येथील वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यां फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात राधे माँविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. राधे माँ या माता की चौकीच्या नावाखाली भक्तांची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राधे माँ यांचे कृत्य धार्मिक भावना भडकविणारे तसेच वर्तन आक्षेपार्ह असल्याचे अ‍ॅड्. फाल्गुनी यांनी तक्रारीत म्हटले आहे. मी स्वत: राधे माँ यांचे वर्तन आक्षेपार्ह असून हिंदूच्या धार्मिक भावना भडकविणारे आहे असे अ‍ॅड् फाल्गुनी यांनी सांगितले. राधे माँसह त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी या अर्जाद्वारे केली आहे. अ‍ॅड फाल्गुनी यांचा अर्ज प्राप्त झाला असून तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी सांगितले.