निष्काळजीपणामुळे बालकाचा जीव धोक्यात घातल्याचा ठपका ठेवत केईएम रुग्णालय अपघातप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदवला. ६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री केईएम रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता विभागात आग लागली. त्यात प्रिन्स राजभर हे दोन महिन्यांचे बालक १५ ते २० टक्के भाजले. प्रिन्सचा डावा हात पूर्णपणे भाजल्याने काढावा लागला. ही शस्त्रक्रिया सोमवारी पार पडली.

प्रिन्स आणि त्याचे कुटुंब मुळचे वाराणसीचे. वाराणसीच्या शासकीय रुग्णालयात प्रिन्सच्या हृदयविकाराचे निदान झाले. उपचार, शस्त्रक्रियेसाठी तेथील डॉक्टरांनी प्रिन्सला केईएम रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस केली. त्यानुसार सोमवारी वडील पन्नेलाल राजभर यांनी त्याला केईएम रुग्णालयात दाखल केले होते. अपघात घडल्यानंतर त्याचे परिणाम किंवा गंभीरतेबाबत राजभर दाम्पत्य अनभिज्ञ होते. सोमवारी प्रिन्सचा हात काढल्यानंतर मात्र वडील पन्नेलाल यांनी पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी संध्याकाळी त्यांनी भोईवाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. जबाब नोंदवून पोलिसांनी भारतीय दंड विधानातील कलम ३३८ नुसार गुन्हा नोंदवला.

अंतर्गत चौकशी अहवालाची प्रतीक्षा

या प्रकरणी रुग्णालयाच्या अंतर्गत चौकशी अहवालातून अपघाताची जबाबदारी निश्चित होईल. भोईवाडा पोलीसही जबाबदारी निश्चित करण्यासाठी समांतर तपास करणार आहेत. अपघात घडला त्या वेळी कर्तव्य बजावणारे डॉक्टर, परिचारिका, अन्य कर्मचाऱ्यांसह प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. तसेच यंत्रसामग्रीचा दर्जा, देखभाल करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींचीही चौकशी करण्यात येणार आहे.