करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी हातांची स्वच्छता गरजेची आहे. याबाबत वारंवार जनजागृती केली जात असल्याने सध्या बाजारात हँड सॅनिटायझरची प्रचंड मागणी आहे. मात्र, याचा गैरफायदा घेत काही औषध दुकानदार चढ्या किंमतीत सॅनिटायझर विकत आहेत. मुंबईतील अशाच एका औषध दुकानावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या मेडिकलच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोरिवली (पश्चिम) येथील मेडिकल दुकानात बुधवारी हँड सॅनिटाझर चढ्या किंमतीत विकत असल्याची तक्रार एका २१ वर्षीय तरुणाने पोलिसांना दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी खातरजमा केल्यानंतर संबंधित मेडिकलच्या मालकीणीवर भादंवि कलम १८८ नुसार दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

ज्या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, केंद्र सरकारच्या आवश्यक वस्तू अधिनियमानुसार, चढ्या किंमतीत वस्तू विकल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, २०० मिली बाटली १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत असताना संबंधीत मेडिकलमधील विक्रेत्याने ५०० मिलीची हँड सॅनिटायझरची बाटली तक्रारदार तरुणाला ६३० रुपयांना विकली होती.