एकाचा मृत्यू; १४ जणांची सुखरूप सुटका

दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरातील ‘चर्चिल चेंबर’ला रविवारी दुपारी भीषण आग लागली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, दोघेजण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत इमारतीत अडकलेल्या १४ रहिवाशांची सुखरूप सुटका केली.

कुलाबा परिसरातील हॉटेल ताजमहालच्या मागील मेरी वेदर रोडवरील चार मजली ‘चर्चिल चेंबर’च्या तिसऱ्या मजल्यावर रविवारी दुपारी १२.२० वाजता आग लागली. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

आगीमुळे इमारतीमध्ये धुराचे लोट होते. त्यामुळे बचावकार्य करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या तिसऱ्या मजल्यावर १५ रहिवासी अडकले होते. त्यापैकी पाच जणांना धुरामुळे त्रास झाला होता. त्यांना इमारतीमधून सुखरूप बाहेर काढून त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. इमारतीत अडकलेल्या १५ पैकी पाच जणांना जवानांनी शिडीच्या साह्य़ाने इमारतीतून बाहेर काढले. उर्वरित रहिवाशांना पायऱ्यांवरून इमारतीबाहेर आणण्यात आले. आगीमध्ये होरपळलेले श्याम नायर (५४) यांना जी. टी. रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या आगीत युसूफ पुनावाला (५०) आणि बुर्मल संतोष पाटील (२९) हे दोघे जखमी झाले. युसूफ पुनावाला यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बुर्मलवर उपचार केल्यानंतर त्याला घरी पाठविण्यात आले. दुपारी ३.२५ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. इमारतीच्या वरच्या मजल्यावरून खिडक्यांना लोखंडी ग्रिल नसल्यामुळे शिडीवरून इमारतीमध्ये प्रवेश करणे अग्निशमन दलाच्या जवानांना शक्य झाले. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. ही इमारत जुनी असून तिचे जिने अरुंद आहेत.

कुलाबा परिसरातील या भागात नेहमी देश-विदेशातील पर्यटकांची मोठी वर्दळ असते. तसेच कुलाबा येथे खरेदी आणि कामाच्या निमित्ताने येणाऱ्या नागरिकांचीही मोठी गर्दी असते. त्यामुळे येथे वाहनांची आणि पादचाऱ्यांची मोठय़ा संख्येने ये-जा सुरू असते. अनेकदा या परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न भेडसावतो. मात्र, रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने तुलनेत या भागात तुरळक वर्दळ होती. त्यामुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचून वेळीच मदतकार्य सुरू करून इमारतीत अडकलेल्या रहिवाशांची सुखरूप सुटका करण्यात यश आले.