मुंबई : नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल ३९ तास झुंज द्यावी लागली.

नागपाडा परिसरातील बेस्टच्या मुंबई सेंट्रल आगारासमोरील सिटी सेंटर मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर गुरुवारी रात्री ८.५३च्या सुमारास आग लागली. हे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले.

या मॉलमध्ये मोबाइल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठय़ा प्रमाणावर दुकाने आहेत. त्यामुळे आगीने काही क्षणातच अक्राळविक्राळ रूप धारण केले. मॉलमधील तिसरा मजलाही आगीच्या विळख्यात सापडला. आगीच्या ज्वाळांचा भडका आणि धूर यामुळे अग्निशमन करणाऱ्या जवानांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. गुरुवारी लागलेली ही आगी शनिवारी सकाळी ११.४०च्या सुमारास नियंत्रणात आली.

या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा वापर करावा लागला. पाण्यासाठी टँकरच्या २०३ फेऱ्या कराव्या लागल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

सहा कर्मचारी जखमी : सिटी सेंटर मॉलमध्ये लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी तैनात असलेले अग्निशामक चंद्रशेखर तुकाराम सावंत (५५) यांना शनिवारी धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तत्काळ त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत जखमी झालेल्या अग्निशमन दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या सहावर पोहोचली आहे.