‘मेक इन इंडिया’ सप्ताहाअंतर्गत रविवारी गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र रजनी कार्यक्रमाचे संपूर्ण व्यासपीठ आगीत जळून खाक झाले. मात्र, या आगीत थर्माकॉल आणि फायबरपासून तयार करण्यात आलेले तुकोबा, सप्तश्रृंगी, विठोबा आणि महालक्ष्मी यांचे पुतळे आश्चर्यकारकरित्या बचावल्याने ‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः’ या श्लोकाचा प्रत्यय आला.तब्बल साडेतीन कोटी रूपये खर्चून प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या देखरेखीखाली हे व्यासपीठ तयार करण्यात आले होते. हे व्यासपीठ तयार करणाऱ्या टीमने हा प्रकार दैवी कृपा असल्याचे म्हटले आहे. संपूर्ण व्यासपीठ आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे हे पुतळेही जळून खाक होतील, असे आम्हाला वाटले होते. मात्र, हे  पुतळे सुखरूप असल्याची प्रतिक्रिया व्यासपीठ तयार करणाऱ्या टीममधील एका कलाकाराने दिली. आगीच्या घटनेबद्दल बोलताना नितीन देसाई यांनी सांगितले की, समुद्रकिनारी असणारे कार्यक्रमाचे ठिकाण लक्षात घेऊनच व्यासपीठासाठी सामुग्री निवडण्यात आली होती. व्यासपीठ तयार करण्यासाठी धातूचा वापर करण्यात आला होता. याशिवाय, व्यासपीठावरील गोष्टींसाठी अॅक्रेलिक, फायबर, धातू आणि काचेचा उपयोग करण्यात आला होता. आम्ही कार्यक्रमाच्यादिवशी साधारणपणे ४.३० वाजता संबंधित यंत्रणेकडे व्यासपीठाचा ताबा दिला होता. यानंतर यंत्रणांकडून व्यासपीठाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता. हे व्यासपीठ तयार करताना आगीच्यादृष्टीने सर्व काळजी आणि खबरदारी घेण्यात आल्याचेही नितीन देसाई यांनी सांगितले.

संध्याकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या ‘महाराष्ट्र रजनी’मध्ये तासाभरानंतर पूजा सावंत आणि सहकारी यांचे ‘आता वाजले की बारा’ या लावणी नृत्याचे सादरीकरण सुरू होते. त्या वेळी व्यासपीठाच्या खाली आग दिसू लागली. जोरदार वाऱ्यांमुळे आग दहा मिनिटांत संपूर्ण व्यासपीठावर पसरली. या आगीत संपूर्ण व्यासपीठ जळून खाक झाले. व्यासपीठाच्या ठिकाणी सात मोठय़ा क्रेन्स लावण्यात आल्या होत्या. या क्रेन्सवरील मोठे लाइट्सही आगीत खाक झाले.