८५ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका; अग्निशमन दलाचा जवान जखमी

वांद्रे येथील महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) कंपनीच्या नऊ  मजली इमारतीला सोमवारी दुपारी आग लागली. इमारतीतील वातानुकूलन यंत्राने पेट घेतला आणि संपूर्ण इमारत धुराने वेढली. आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचा जवान  जखमी झाला. इमारतीच्या गच्चीवर अडकलेल्या ८५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने सुखरूप खाली उतरवले.

सागरी सेतूच्या अलीकडे वांद्रे पश्चिमेकडे उतरणाऱ्या उड्डाणपुलाशेजारी ही इमारत आहे. दुपारी दोनच्या सुमारास इमारतीच्या लेखा विभागातील वातानुकूलन उपकरणाने पेट घेतला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीमुळे या विभागातील बहुतांश कर्मचारी जेवणासाठी बाहेर होते. विभागात उपस्थित कर्मचाऱ्यांनी अग्निशामक उपकरणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग भडकली. वीज वाहिन्यांसह लाकडी साहित्य आणि कागदपत्रांनी पेट घेतला आणि नोंदणी विभागातही आग पसरत गेली. आग नियंत्रणाबाहेर गेल्याने कर्मचाऱ्यांनी अन्य सहकाऱ्यांना साद घालत खाली धाव घेतली.

काही वेळाने आग पसरून धुराचे लोट खिडक्यांद्वारे बाहेर पडू लागले. पायऱ्या, लिफ्टमधून धूर वरच्या मजल्यांवर पसरला. त्यामुळे चार ते नऊ  माजल्यांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गच्चीत धाव घेतली. खालच्या मजल्यावरील कार्यालयांतील कर्मचारी त्याच क्षणी सुखरूप बाहेर पडले. परंतु वरच्या मजल्यांवरील सुमारे १०० कर्मचारी गच्चीत अडकून पडले.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा फौजफाटा इमारतीजवळ पोचला. जवानांनी अंदाज घेत मागच्या-पुढच्या बाजूने अद्ययावत शिडय़ा लावून गच्चीत अडकलेल्यांसाठी बचावकार्य सुरू केले. तर दुसऱ्या पथकाने इमारतीच्या आत शिरून आग विझवण्याचा प्रयत्न केला.

अग्निशमन दलाच्या तिसऱ्या पथकाने धुराने गुदमरून कोणी इमारतीत अडकून पडले का त्याचा शोध घेतला.

दुर्घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १६ गाडय़ा, दोन जेटी, सात पाण्याचे टँकर, १० अग्निशमन दलाच्या रुग्णवाहिका आणि प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यासह १७५ कर्मचारी बचाव कार्यात जीवाची बाजी लावत होते.

संध्याकाळी सात वाजेपर्यंत ६० ते ७० जणांना गच्चीवरून सुखरूप खाली उतरवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या प्रयत्नात अग्निशमन दलाचे जवान सागर साळवे (२५)गुदमरले. त्यांना तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

आगीत एकही अधिकारी, कर्मचारी जखमी झालेला नाही, अशी माहिती एमटीएनएलच्या व्यवस्थापिका नीता असफर यांनी दिली. दुर्घटनास्थळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शालेय मंत्री आणि स्थानिक आमदार आशीष शेलार यांनी भेट देऊन माहिती घेतली.

संयम जिंकला

एमटीएनएलचे कर्मचारी धनंजय काळे पाचव्या मजल्यावरील त्यांच्या कार्यालयात अडकले होते. कार्यालयाबाहेर धुराचे मोठे लोट वाहत होते. त्यामुळे तेथून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी जाणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे सुरक्षित बाहेर पडलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांचाही जीव कासावीस होत होता. ते काळे यांना फोन करून त्यांच्या संपर्कात होते. काळे यांनी मात्र कोणतीही धावपळ न करता किंवा जीव धोक्यात येईल, अशी कोणतीही कृती न करता संयम दाखवत मदतीची वाट पाहिली. अखेर दीड तासाने अग्निशमन दलाच्या जवानांनी काळे यांना सुखरूप बाहेर काढले. तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

नातेवाईकांची गर्दी

आग लागल्याने कर्मचारी अडकून पडल्याचे समजताच अनेकांच्या कुटुंबीयांनी एमटीएनएल इमारतीकडे धाव घेतली. बोरिवलीला राहणाऱ्या सुप्रिया दळवी एमटीएनएलच्या प्रशासकीय विभागात काम करतात. त्यांचे कार्यालय आठव्या मजल्यावर आहे. त्या गच्चीत अडकल्या होत्या. त्यांचे पती आणि मुलगा  इमारतीपाशी आले होते. सुप्रिया खाली येताच दोघांचा जीव भांडय़ात पडला.

वांद्रे स्थानकापर्यंत धूर, शाळा सोडली

एमटीएनएल इमारतीला आग लागल्यानंतर धूर काही क्षणात वाऱ्याबरोबर वांद्रे स्थानकापर्यंत पोचला. एमटीएनएल इमारतीला लागूनच जमात ए जमुरीया तथा जेजे वसाहतीच्या (एसआरए) इमारतींमधील रहिवासी मदतीसाठी खाली उतरले. आग लागलेल्या इमारतीच्या तीन बाजूंनी रहिवासी इमारती आणि पेट्रोल पंप आहे. अन्य  वस्त्यांमध्ये धुराचा त्रास जाणवू लागला. जवळच्या अंजुमन शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना उलटय़ा होऊ  लागल्याने दुपारीच विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले.

गच्चीतला तणाव..

आग लागल्याचे कळताच आम्ही इमारतीच्या गच्चीवर गेलो. भीती तर वाटत होती, मात्र खाली असलेले सहकारी फोनवरून दिलासा देत होते. अग्निशामक दलाचे जवानही आम्हाला उतरवण्याचा प्रयत्न करत होते. आम्हीही भीती घालविण्यासाठी हसून खेळून राहायचा प्रयत्न करत होतो. धुराचे लोट वर यायला लागल्यावर त्रास होऊ  नये, यासाठी पाण्यात भिजवलेला रुमाल तोंडावर बांधला. त्यामुळे धुराचा त्रासही जाणवला नाही, असे एमटीएनएलच्या कर्मचारी छाया वलगे यांनी सांगितले. छाया यांना अग्निशामक दलाच्या जवानांनी शिडीवरून खाली उतरले.

निवृत्त कर्मचारी मदतीला धावला

एमटीएनएलमधून निवृत्त झालेले प्रताप कुलकर्णी इमारतीला आग लागल्याचे समजताच तात्काळ दुर्घटनास्थली आले. आपले सहकारी अडकल्याने ते चिंता व्यक्त करत होते. जे कर्मचारी सुखरूप बाहेर येत होते त्यांना पाणी, चहा देण्याचे काम करत होते. त्यांना धीर देत होते. आयुष्यातील अनेक वर्षे एमटीएनएलमधील सहकाऱ्यांबरोबर काम केले असल्याने कुलकर्णी यांना घरी थांबवले नाही. ते धावतपळत कार्यालयाजवळ दाखल झाले.

उच्चस्तरीय चौकशीची पूनम महाजन यांची मागणी

वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेची उच्च स्तरावर चौकशी करण्याची मागणी खासदार पूनम महाजन केंद्रीय संचार मंत्रालयाकडे पत्राद्वारे केली आहे. इमारतीतील अग्निशमन यंत्रणेचे पालिकेकडून परीक्षण झालेले नाही. इमारतीत आपत्कालीन सूचना यंत्रणेसह आग विझविण्यासाठी पुरेशा साधनांची कमतरता असल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये दिसून आले आहे. तसेच आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करावे, याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिलेले नाही वा एकदाही मॉक ड्रिल केलेले नाही, असेही समजते. ही इमारत वर्दळीच्या ठिकाणी असल्याने अशी दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी उच्च स्तरावर चौकशी करावी, असे या पत्रामध्ये म्हटले आहे.

दुर्घटनेची चौकशी आवश्यक -आशीष शेलार

इमारतीला लागलेल्या आगीची चौकशी होणे आवश्यक आहे.  इमारतीमध्ये अग्निरोधक आणि आपत्कालीन सूचना यंत्रणा उपलब्ध होती का, तसेच त्यांचे परीक्षण केले होते का याचा आढावा घेतला जाईल आणि संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्याना दिली जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री आणि स्थानिक आमदार आशीष शेलार यांनी सांगितले.

आग लागली तेव्हा चौथ्या मजल्यावर होतो. आग लागल्याचे कळताच लेखा विभागात आलो. तेथे दोन अग्निशामक यंत्रांद्वारे आग विझवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. आग वाढायला लागली. आम्ही सर्वाना बाहेर पडायला सांगितले. धुरामुळे समोरचे काहीच दिसत नव्हते. तशात वाट धुंडाळत आम्ही धावत बाहेर पडलो आणि इमारतीची विद्युत यंत्रणा बंद केली.

– एस. एस. जयस्वार, एमटीएनएल कर्मचारी