News Flash

अग्निसुरक्षेबाबत सगळीकडेच अनास्था

एखाद्या आंतरराष्ट्रीय शहराकडे असतात तशी सगळी यंत्रणा, अत्याधुनिक यंत्रसामग्री मुंबई अग्निशमन दलाकडे आहे.

मुंबईत बहुतांश आस्थापनांमध्ये अटींचा विसर; पुण्यात यंत्रणा अपुरी, भंडारा आगीचा पूर्णपणे विस

मुंबई : भांडुपमधील ड्रीम्स मॉल येथे सनराइज रुग्णालयामध्ये आग लागून शुक्रवारी झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर अग्निसुरक्षेबाबत राज्यभर सगळीकडेच अनास्था असल्याचे समोर आले आहे.

मुंबईतील तब्बल ७६२ पेक्षा अधिक खासगी रुग्णालये व नर्सिंग होममध्ये अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजना नसून कित्येक आस्थापनांना या सुरक्षेची जाणीव नाही. पुण्यामध्ये शुक्रवारी फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागून शेकडो गाळे भस्मसात झाले. प्रबळ अग्निशमन यंत्रणा नसल्यामुळे यात प्रचंड नुकसान झाल्याचे उघड झाले आहे. पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलात ५५ टक्के जागा रिक्त आहेत. इतक्या मोठ्या शहराच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी निम्म्याहून कमी मनुष्यबळावर असल्याने त्यांच्याकडून पूर्ण क्षमतेने काम कसे होईल, हा प्रश्न आहे. दोन महिन्यांपूर्वी भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा नवजात शिशूंचा होरपळून मृत्यू झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अग्निपरीक्षा व अग्निसुरक्षा व्यवस्था लागू करण्याचे आदेश दिले होते. दुर्दैवाने आरोग्य विभागाने अग्निपरीक्षण केलेल्या एकाही रुग्णालयात आजपर्यंत अग्निसुरक्षा व्यवस्था बसविण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या परिस्थितीत दररोज वेगवेगळ्या शहरांत घडणाऱ्या आगीच्या दुर्घटनांत मनुष्य आणि वित्तहानी कमीत कमी   करण्याचे आव्हान सर्वच पालिका यंत्रणांपुढे आहे.

एखाद्या आंतरराष्ट्रीय शहराकडे असतात तशी सगळी यंत्रणा, अत्याधुनिक यंत्रसामग्री मुंबई अग्निशमन दलाकडे आहे. मात्र एखाद्या ठिकाणी आग लागली की ती विझवायला वेळ लागला की त्याची चर्चा होते. अनेक इमारती वरून चांगल्या दिसतात, पण आतमध्ये अग्निरोधक यंत्रणा नसते किं वा बंद पडलेली असते. कधी कधी तळघरात, आवारात प्रचंड सामान कोंबलेले असते. इमारतीच्या बाहेर इतकी दाटीवाटी असते की अग्निशमन दलाच्या गाड्या आत जाण्यासही वेळ नसतो. त्यामुळे लोकांनी अग्निरोधक यंत्रणांची वारंवार तपासणी करणे आवश्यक आहे, तसेच आग लागल्यास काय करायचे, स्वत:चा व इतरांचा जीव कसा वाचवायचा त्याचे शिक्षण घेतले पाहिजे. तर आगीचे गांभीर्य वाढणार नाही. कमी मनुष्यबळातही बचावकार्य करता येईल, असे मत  अग्निशमन दलाचे उपप्रमुख हेमंत परब यांनी सांगितले.

 

मुंबईत धोका अधिक का?

मुंबई महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद अग्निशमन दलासाठी करत असते. मात्र मुंबईतील मोठमोठ्या इमारती, वाढती लोकसंख्या, दाटीवाटीच्या वस्त्या, औद्योगिक, रासायनिक प्रकल्प, जमिनीखाली टाकलेल्या ज्वालाग्राही पदार्थांच्या वाहिन्या यामुळे मुंबईला नेहमीच दुर्घटनांचा धोका मोठा आहे.

 

मुंबईतील अग्निशमन बळ

अग्निशमन दल  आर्थिक तरतूद  ५४१ कोटींची तरतूद

कर्मचारी व अधिकारी –२८००

३५ –अग्निशमन केंद्र

१८ –छोटी अग्निशमन केंद्रे

२० -अद्ययावत गाड्या

६३–फायर इंजिन

३२- वॉटर टँकर

रासायनिक आगी विझवण्यासाठी फोम टेंडर लहान गल्ल्यांमध्ये लागलेल्या आगी विझवण्यासाठी २४ फायर दुचाकी   अद्ययावत रोबोट

पुण्यातील ‘फॅशन स्ट्रीट’ भस्मसात

पुणे : महात्मा गांधी रस्त्यावरील  तरुणाईचे आकर्षण असलेल्या फॅशन स्ट्रीट परिसरात शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत साडेपाचशे स्टॉल जळून भस्मसात झाले. दाट वस्तीत असलेल्या फॅशन स्ट्रीटमधील अरुंद जागेत पादत्राणे, सौंदर्यप्रसाधने, कपडे, चामडी वस्तू तसेच गृहोपयोगी साहित्याची विक्री करणारे पथारी व्यावसायिक आहेत. आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला असून दोन ते अडीच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

मुंबईत आणखी एक आग

मुंबई :  शनिवारी पहाटे प्रभादेवी येथील गॅमन हाऊस या पाच मजली इमारतीच्या तळघरात भीषण आग लागली. या आगीत अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले.  बारा तासांच्या प्रयत्नांनंतर संध्याकाळी पाच वाजता आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 2:12 am

Web Title: fire at sunrise hospital at dreams mall in bhandup akp 94
Next Stories
1 ‘शिवनेरी’कडे प्रवाशांची पाठ
2 होळी, धूलिवंदनावर करोनाचे सावट
3 नाट्य परिषदेची नियामक मंडळ सभा रद्द केल्याने सदस्यांची निदर्शने
Just Now!
X