06 March 2021

News Flash

वरळी आग: अग्निशमन दलाच्या १२ कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास

‘जागेबाबत योग्य माहिती मिळाली नाही’

वरळी येथील साधना हाऊसला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत रसायनयुक्त काळ्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होत असल्याने १२ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. यात अग्निशमन दलाचे एक अधिकारी, दोन महिला आणि नऊ जवानांचा समावेश आहे. सर्व कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोदार रुग्णालयातील सहा जवानांनाही रविवारी दुपारी केईएममध्ये उपचारासाठी दाखल केले.

शनिवारी साधना हाऊस येथे तळमजल्यावर आग लागली होती. वरळीचे अग्निशमन अधिकारी विशाल विश्वासराव  (३८) आणि त्यांचे सहकारी विजय मालुसरे (४७) यांना केईएम रुग्णालयाच्या श्वसनविकार विभागाच्या अतिदक्षता विभागात ठेवले आहे.  त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती केईएम रुग्णालयाच्या श्वसनविकार विभागाच्या प्रमुख डॉ. अमिता आठवले यांनी दिली.या अपघातात अग्निशमन दलाच्या स्वप्नाली चिकणे (२२) या धुराने गुदमरल्याने बेशुद्ध झाल्या होत्या. सध्या त्या शुद्धीवर असल्या तरी श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्यावर्षी याच दिवशी कमला मिलला आग लागली त्यावेळी वरळीचे आम्ही कर्मचारी त्या ठिकाणी होतो. त्यामुळे तो प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहिल्याचे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.

‘जागेबाबत योग्य माहिती मिळाली नाही’

आग कुठे लागली तेच समजत नव्हते. फक्त काळा धूर बाहेर पडत होता. आम्ही बराच वेळ पाणी मारून विझविण्याचा प्रयत्न करत होतो. बऱ्याच वेळाने औषधी आणि रसायनांचा साठा समजले.तेव्हा फोमचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू झाले असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीडीडी चाळीतील माळीदेवी सयानी (८५) वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्या शनिवारी चालत्या फिरत्या होत्या. संध्याकाळी धूर पसरला तेव्हा आम्ही सगळेच घराबाहेर होतो. त्याही बाहेरच बसल्या होत्या. तासाभराने त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि तोंडातून फेस आला. त्यांच्या मुलाने लगेचच त्यांना पोदार रुग्णालयात नेले. तेथून त्यांना केईएममध्ये पाठविले. परंतु जाताना रिक्षातच त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री कुटुंबासह सर्वच जण अंत्यविधीसाठी त्यांच्या गावी घेऊन गेले, असे चाळीतील रहिवाशींनी सांगितले. दरम्यान, या महिलेचा मृत्यू आगीच्या घटनेच्या काही काळ आधी झाल्याचे वरळी पोलीस ठाण्यातून समजते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 12:54 am

Web Title: fire at worli
Next Stories
1 नव्या वर्षांत कोकण रेल्वे मार्गावर १० नवीन स्थानके
2 वित्तीय सुधारणेत खर्चवाढीचा गतिरोधक
3 वादग्रस्त उपसंचालकांसाठी आठवले यांची शिफारस!
Just Now!
X