शैलजा तिवले

मुलुंड येथील अ‍ॅपेक्स रुग्णालयात आग लागलेले जनित्र हे रुग्णालयाने जुने विकत (सेकंड हॅण्ड) घेतले होते. त्यामुळे बिघाड होऊन ते पेटले असण्याची शक्यता आहे, असे चौकशी समितीच्या अहवालातून निदर्शनास आले आहे. तसेच रुग्णालयाने अनधिकृत बांधकाम केल्याचेही उघडकीस आले आहे.

शहरातील वीजपुरवठा १२ ऑक्टोबरला खंडित झाल्यानंतर अ‍ॅपेक्स रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा जनित्रावर सुरू होत्या. तांत्रिक बिघाडामुळे जनित्राने पेट घेतल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे रुग्णालयातील ३८ करोनाबाधित रुग्णांना इतर रुग्णालयांत पाठविण्यात आले. यातील गंभीर प्रकृतीच्या १२ रुग्णांना फोर्टिस रुग्णालयात पाठविले, परंतु या प्रक्रियेदरम्यान पांडुरंग कुलकर्णी (८२) यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या दिवशी वीरेंद्र सिंग (५५) यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी चौकशी करण्यासाठी पालिकेने समिती नियुक्त केली होती. या समितीने अहवाल नुकताच सुपूर्द केला आहे. रुग्णालयात वापरात असलेले जनित्र हे जुने विकत घेतलेले होते. रुग्णालयातील सेवा या अत्यावश्यक असल्याने जनित्राचा दर्जा चांगला असणे आवश्यक असते. त्या दिवशी वीज जवळपास सात ते आठ तास नसल्याने जनित्र सुरू ठेवावे लागले. जुने जनित्र एवढा काळ सुरू राहिल्याने पेट घेतला असण्याची शक्यता आहे. रुग्णालयाने नवे जनित्र बसविणे आवश्यक होते, असे या अहवालात अधोरेखित केले आहे.

अनधिकृत बांधकाम

समितीच्या पहिल्या भेटीत रुग्णालयाने गच्चीवर शेड टाकून दोन ते तीन खोल्या अनधिकृतपणे उभारल्याचे आढळले, परंतु दुसऱ्या भेटीच्या आत रुग्णालयाने हे बांधकाम पाडले होते. त्यामुळे अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी कारवाई करण्याचे समितीने सूचित केले आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. या समितीत ‘टी’ विभागाचे साहाय्यक आयुक्त किशोर गांधी, डॉ. प्रदीप आंग्रे आणि पालिकेच्या यांत्रिक, तसेच विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.

अहवालात काय?

* अ‍ॅपेक्स रुग्णालयातून फोर्टिसमध्ये पाठविल्यानंतर मृत्यू झालेले वीरेंद्र सिंग (५५) हे गंभीर अवस्थेत होते. त्यांना अधिक चांगल्या सुविधांसह फोर्टिसमध्ये पाठविणे शक्य होते. मात्र रुग्णालयाने ही सेवा दिली नाही, असे या अहवालात नमूद केले आहे.

* रुग्णालयात आढळलेल्या अनधिकृत बांधकामानंतर रुग्णालयाने नर्सिग होम कायद्याअंतर्गत आवश्यक बाबींची पूर्तता केली आहे का, याची शहानिशा करण्यासाठी पालिकेकडून तपासणी केली जाणार आहे. यासाठीच्या सूचनाही पालिकेने दिल्या आहेत, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.