काळबादेवीतील आगीचे प्रकरण ताजे असतानाच शनिवारी पवईत आणखी एक भीषण अग्नितांडव घडले. पवईच्या चांदिवली येथील ‘लेक होम’ या २२ मजली इमारतीच्या १४ व्या मजल्याला लागलेल्या आगीत सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला तर २८ जण गंभीर जखमी झाले. लघुपथनामुळे (शॉर्ट सर्किट) ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतांमध्ये पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. सर्व जखमींवर पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चांदिवलीतील पवई फार्मा मार्गावर ‘लेक होम’ इमारत आहे. शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास इमारतीच्या १४ व्या मजल्यावरील १४०३ क्रमांकाच्या सदनिकेला आग लागली. वातानुकूलन यंत्रात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. क्षणार्धातच आग १५व्या मजल्यापर्यंत पसरली त्यामुळे रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाडय़ा रवाना झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी इमारतीचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. इमारतीच्या दोन्ही बाजूने पाण्याचा मारा सुरू होता. दीड तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यंत्रणांना यश आले. इमारतीत अडकलेल्या १३ जणांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले.
 आगीमुळे इमारतीत धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे इमारतीतून बाहेर पडणाऱ्या लोकांना श्वसनाचा त्रास होत होता. काही लोकांनी उद्वाहनातून (लिफ्ट) खाली येण्याचा प्रयत्न केला. परंतु उद्वाहनातील धुरामुळे गुदमरून त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. श्वसनाचा त्रास जाणवणाऱ्या सात जणांना पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच सात जणांचा मृत्यू झाला. आगीत जबर जखमी झालेल्या आशिष मुखर्जी यांना ऐरोलीच्या बर्न रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. धुरामुळे अग्निशमन दलाचे सहाय्यक केंद्राधिकारी पवार व जवान नामदेव पाटील यांनाही श्वसनाचा त्रास झाला. मात्र, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान, वांद्रे रेक्लमेशन येथील झोपडपट्टील संध्याकाळी लागलेल्या आगीत तीन जण जखमी झाले. त्यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वी १६ मार्च २०१४ रोजी  सुंदरबन ठाणे येथील आगीत दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला होता तर मे २०१५ मध्ये काळबादेवी येथील आगीत चार अग्निशमन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

आग लागल्यावर उद्वाहनाचा वापर करू नये अशा सूचना दिल्या जातात. आम्ही ज्या ठिकाणी आग लागली त्याच्या वरच्या मजल्यावरील १८ जणांना सुखरूप बाहेर काढले. परंतु काही जणांनी उद्वाहनातून खाली येण्याची चूक केली. त्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. उद्वाहनातून जाण्याची चूक त्यांच्या जिवावर बेतली.
– श्री. रहांगदळे, मुख्य अग्निशमन अधिकारी