देवनार येथील कचराभूमीला सोमवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याने या परिसरात मोठय़ा प्रमाणात धुराचे लोट निर्माण झाले आहेत. अग्निशमन दलाला याची माहिती मिळाल्यानंतर दलाच्या १० ते १२ गाडय़ा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. सायंकाळी उशिरापर्यंत अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू होते. सायंकाळी अग्निशमन दलाच्या जवानांनी कचराभूमीला लागलेल्या आगीवर नियंत्रण आणले. मात्र जवळच असलेले गोदाम रात्री उशिरापर्यंत आगीने धुमसत होते.

सोमवारी दुपारी एकच्या सुमारास संत निरंकारी नगर परिसराला लागून असलेल्या कचराभूमीला आग लागली. या ठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनी ही माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर दलाच्या आठ गाडय़ा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आगीमुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. २०१६ मध्ये येथील कचराभूमीला वारंवार आगी लागल्या होत्या. त्यामुळे कचराभूमीच्या परिसरात जाण्यास निर्बंध आणले गेले. वारंवार लागणाऱ्या आगींच्या पाश्र्वभूमीवर याची चौकशी करण्यात आली. चौकशीअंती या आगी जाणुनबुजून लावल्या जात असल्याचे समोर आले. त्यामुळे या ठिकाणी सीसी टीव्ही लावण्यात आले आहेत. शिवाय येथे खासगी सुरक्षा रक्षक तैनात असत. त्याऐवजी सध्या या ठिकाणी राज्य सुरक्षा बलाचे सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. काही भंगार माफियांकडून आगी लावल्या जात असल्याचे समोर आल्यानंतर अनेक जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. काहींना अटकदेखील केली. तसेच या ठिकाणी कचरा वेचणाऱ्यांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली. तर संपूर्ण कचराभूमीभोवती संरक्षण भिंत घालण्यात आली आहे. इतकी काळजी घेऊनही सोमवारी दुपारी या ठिकाणी आग लागल्याने पालिका अधिकारी चक्रावून गेले आहेत. कुणीतरी जाणुनबुजून आग लावल्याचा संशय व्यक्त होत आहे.

दोन गोदामांना आग

गोवंडी परिसरातील गौतम नगर येथील महाराष्ट्र कम्पाऊंड परिसरातदेखील सोमवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीमध्ये जीन्स पॅन्टची आणि लाकडाची दोन गोदामे पूर्णपणे जळून खाक झाली आहे. पालिकेच्या एम पश्मिम कार्यालयाजवळच ही दोन्ही गोदामे होते. दुपारी एकच्या सुमारास काही कर्मचारी या ठिकाणी काम करत असताना ही आग लागली. अग्निशमन दलाच्या सहा गाडय़ांनी या आगी दोन तासांच्या शर्थीनंतर आटोक्यात आणल्या. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही गोदामे पूर्णपणे जळून खाक झाली आहे.