महालक्ष्मी कारशेडमधील घटना; दहा दिवसांत आगीची तिसरी घटना
पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी येथील कार्यशाळेत देखभाल दुरुस्तीसाठी गेलेल्या लोकलच्या एका डब्याला आग लागण्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या आगीत हा डबा भस्मसात झाला असला, तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग तासाभरात आटोक्यात आणली. गेल्या दहा दिवसांत उपनगरीय रेल्वेगाडय़ांच्या रिकाम्या डब्यांना आग लागण्याची ही तिसरी घटना आहे.
रेल्वेमधील प्रत्येक डबा दर दीड वर्षांच्या कालावधीनंतर संपूर्ण देखभाल-दुरुस्तीसाठी कार्यशाळेत जातो. याला पिरियॉडिक ओव्हरहॉल किंवा पीओएच असे म्हणतात. २०९५-बी या क्रमांकाचा डबा याच कारणासाठी महालक्ष्मी कार्यशाळेत आला होता. सकाळी ११च्या सुमारास या डब्याची देखभाल दुरुस्ती चालू असताना वेल्डिंगचे काम केले जात होते. त्या वेळी खाली सांडलेल्या तेलावर वेल्डिंगच्या ठिणग्या पडल्या आणि आग लागली. संबंधित डब्यात गाडीचे मोटर असल्याने या डब्यात तेलही होते. त्यामुळे आग आणखीनच भडकली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून हा परिसर काम करण्यासाठी सुरक्षित असल्याचे सांगितले. तसेच या आगीत संबंधित डबा वगळता इतर कोणतीही हानी झाली नाही. आगीची चौकशी होणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.