मुंबईतील जुहू येथे बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. जखमींवर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमधील आठ जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

या दुर्घटनेत मृत पावलेल्यांमध्ये पाच कामगार आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. विलेपार्ले येथील जेव्हीपीडीमध्ये ही दुर्घटना घडली. या आगीत जखमी झालेल्यांवर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुर्घटनेत मृत पावलेले आणि जखमी झालेले बहुतांश कामगार हे पश्चिम बंगालचे आहेत. बांधकाम सुरु असलेली इमारत १३ मजल्यांची असून या इमारतीच्या तळमजल्यावर सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली. त्यानंतर ही आग वरच्या मजल्यांवर पोहोचली.

सिलिंडरचा स्फोट झाल्यासारखा आवाज ऐकल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. दुर्घटना झालेल्या ठिकाणी पोलिसांना एलपीजी सिलिंडर आणि स्टोव्ह आढळून आला. या दुर्घटनेत मृत पावलेल्या आणि जखमी झालेल्या व्यक्तींची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. ‘या दुर्घटनेत जखमी झालेले अनेकजण ६० टक्क्यांहून अधिक भाजले आहेत. त्यामुळे त्यांची स्थिती अतिशय नाजूक आहे,’ अशी माहिती कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.