मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथील एका मेडिकल स्टोअरमध्ये आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत नऊ जणांचा मृत्यू झाला. अंधेरी पश्चिम येथील जुहू गल्लीतील निगम मिस्त्री चाळीच्या तळमजल्यावर हे मेडिकल स्टोअर आहे. स्टोअरच्या वरच्या मजल्यावर स्टोअर मालकाचे कुटुंब राहत होते. स्टोअरला आग लागल्यानंतर आगीची झळ वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली. आग इतकी भीषण होती की संपूर्ण परिसरात उंचच उंच धुराचे लोट पसरले होते. घरातून बाहेर पडण्याचा रस्ता स्टोअरमधून जाणारा असल्याने स्टोअर मालक खान कुटुंबियांना सुटकेचा मार्गच मिळाला नाही आणि आगीत कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला.

मृत्यूमुखींमध्ये एकाच कुटुंबातील दोन महिला, दोन पुरूष आणि पाच लहान मुलांचा समावेश आहे. सबुरिया खान(५२), सिद्दिक खान(३५), राबिल खान (२८), मोझेल खान(८), उन्नीहय खान(५), अलिझा खान(४), तुबा खान(८) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं असून, अल्तजा या तीन महिन्यांच्या चिमुकलीचाही या आगीत मृत्यू झाला.

मेडिकल स्टोअरला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तासाभराच्या शर्थीच्या प्रयत्नांनतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. पण तोपर्यंत या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी होती. जखमी महिलेवर कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान जखमी महिलेचाही मृत्यू झाला.

आगीत संपूर्ण मेडिकल स्टोअर जळून खाक झाले. परिसर अतिशय चिंचोळा असल्याने बाहेर कसे यावे हे न कळल्याने ही मोठी दुर्घटना घडली. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. शॉटसर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.