रे रोड येथील पावडर बंदरामध्ये दुरुस्तीसाठी दाखल झालेले जहाज आगीत धुमसत असताना अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाताळचे वेध लागले असून अग्निशमन दल प्रमुख कुटुंबासमवेत गोव्याला रवाना झाले आहेत. त्याचबरोबर मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून तब्बल ३२ अधिकारी सुट्टीवर गेले आहेत. ऐरवी छोटी-मोठी कारणे पुढे करून आपल्या सुट्टय़ा रद्द करणाऱ्या या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृतीबद्दल अग्निशमन दलामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईमध्ये सध्या नाताळची धामधूम सुरू झाली आहे. तसेच नववर्षांच्या जल्लोषाच्या योजना आखल्या जात आहेत. या पाश्र्वभूमीवर पोलीस दलाप्रमाणेच अग्निशमन दलाने दक्ष राहणे गरजेचे आहे. मात्र अग्निशमन दलाचे प्रमुख सुहास जोशी स्वत: नाताळनिमित्त पाच दिवस सुट्टीवर गेले असून ते आपल्या कुटुंबकबिल्यासह गोव्याला रवाना झाल्याचे समजते. आश्चर्याची बाब म्हणजे अग्निशमन दलातील एक सहाय्यक विभागीय अधिकारीही पाच दिवसांची सुट्टी घेऊन त्यांच्याबरोबर गोव्याला गेला आहे. अग्निशमन दलामधील पाचपैकी केवळ दोन उपमुख्य अग्निशमन अधिकारी शनिवारी कर्तव्यावर होते. सुहास जोशी रजेवर गेल्यामुळे उपमुख्य अग्निशमन अधिकारी ए. एन. वर्मा यांच्याकडे अग्निशमन दल प्रमुखपदाचा भार तात्पुरता देण्यात आला आहे. सुट्टीवर असलेल्या तीन उपमुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांपैकी दोघे ४८ तासांच्या सेवेनंतर येणाऱ्या साप्ताहिक सुट्टीवर गेले होते. अग्निशमन दलातील नऊ विभागीय अधिकाऱ्यांपैकी तिघे नैमित्तिक रजेवर गेले असून अन्य तिघे शनिवारी साप्ताहिक सुट्टीवर होते. एकूण १३ पैकी ७ सहाय्यक विभागीय अधिकारी शनिवारी अनुपस्थित होते. यापैकी ४ जण नैमित्तिक रजेवर गेले असून तिघे शनिवारी साप्ताहिक सुटीवर होते. मुंबईमधील एकूण ४० केंद्र अधिकाऱ्यांपैकी तब्बल १८ जण शनिवारी रजेवार होते. यापैकी आठ जणांनी नैमित्तिक रजा घेतली असून उर्वरित केंद्र अधिकारी ४८ तासांनंतर येणाऱ्या साप्ताहिक सुट्टीवर लघुरजेवर होते.  सलग ४८ तास कर्तव्यावर असलेल्या या अधिकाऱ्यांना त्यानंतर एक दिवस लघुरजा दिली जाते. तसेच २४ तास सेवा बजावणाऱ्या या अधिकाऱ्यांना विशेष भत्तेही दिले जातात. नाताळ आणि नववर्षांच्या स्वागतासाठी मुंबईत होणारा जल्लोष लक्षात घेता अग्निशमन दल प्रमुखांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्तव्यावर दक्ष राहणे क्रमप्राप्त आहे. असे असतानाही मौजमजा करण्यासाठी ही मंडळी सुट्टी घेऊन आपापल्या कुटुंबकबिल्यासह विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. दरम्यान, घरगुती समस्या अथवा अन्य कारणांसाठी रजा मागणाऱ्या अग्निशामक अथवा तत्सम कर्मचाऱ्यांना वरिष्ठ निरनिराळी कारणे पुढे करून ती नाकारतात, मात्र नाताळनिमित्त गजबजलेल्या मुंबईला वाऱ्यावर सोडून वरिष्ठ अधिकारी स्वत: मौजमजा करण्यासाठी रजेवर जातात, याबद्दल अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.