नऊ मीटरच्या रस्त्यांवर दुतर्फा पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा;अग्निशमन वाहने अडकल्याने ‘सरगम’ची आग विझवण्यात विलंब

प्रसाद रावकर, मुंबई</strong>

टिळकनगर येथील सरगम इमारतीला लागलेली आग विझवण्यात झालेला विलंबच पाच रहिवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे उघड होत आहे. घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या खऱ्या; पण इमारतीबाहेरील अरुंद रस्त्यावरील उभ्या वाहनांमुळे या गाडय़ा इमारतींपर्यंत पोहोचण्यात विलंब झाला. या पाश्र्वभूमीवर मुंबईतील सर्वच भागांतील उंच इमारतींसमोरील अरुंद रस्ते आणि त्यावर दुतर्फा उभी केली जाणारी वाहने यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आदींसाठी उंच इमारतींलगत नियमानुसार सोडलेल्या आवश्यक त्या रुंदीच्या रस्त्याचा वापर केवळ दुतर्फा वाहने उभी करण्यासाठी होत असून त्यामुळे हे रस्ते आक्रसले आहेत. परिणामी वाहतूक कोंडीला आयते आमंत्रण मिळत असून दुर्घटना घडल्यानंतर मदतकार्यासाठी धाव घेणाऱ्या अग्निशमन दलालाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

टिळकनगरमधील ‘सरगम’ इमारतीलगतचा रस्ता जेमतेम वीस फुटांचा असून त्यावर दुतर्फा वाहने उभी करण्यात येतात. आग लागली तेव्हा, गुरुवारी सायंकाळीही अशीच परिस्थिती होती. त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाडय़ा इमारतीजवळ पोहोचूनही इमारतीच्या आत प्रवेश करण्यास त्यांना विलंब झाला. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि रहिवाशांनी या वाहनांच्या काचा फोडून ती दूर नेली. काही हलकी वाहने अक्षरश: उचलून अन्य इमारतींच्या आवारात ठेवण्यात आली. त्यानंतर हा रस्ता मोकळा झाला व अग्निशमन दलाचे काम सुरू झाले.

गेल्या काही दशकांमध्ये मुंबईतील चाळींच्या जागेवर मोठय़ा संख्येने टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. या इमारतींना अंतर्गत वाहनतळाची सुविधा निर्माण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. उंच इमारतीलगत नऊ मीटर रस्ता सोडण्याची सक्ती पालिकेने केली होती.मात्र रुंद झालेल्या या रस्त्यांकडे कोणत्याच यंत्रणांचे लक्ष नाही. इमारतीमधील वाहनतळात वाहन उभे करण्यासाठी मासिक शुल्क भरावे लागत असून हा खर्च टाळण्यासाठी अनेक रहिवासी आपले वाहन इमारतीलगतच्या रुंद केलेल्या रस्त्यावर उभ्या करीत आहेत. तसेच काही फेरीवाल्यांनीही या रस्त्यांवर जागा अडवल्या आहेत. परिणामी, दुतर्फा अस्ताव्यस्त उभी वाहने आणि फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे.

या प्रकाराची मुंबईच्या २०१४-३४ च्या विकास आराखडय़ामध्ये गंभीर दखल घेण्यात आली आहे. आजवर ३२ मीटरहून अधिक उंचीच्या इमारतीलगत केवळ नऊ मीटर रस्ता सोडण्याचे बंधन होते. तथापि आता ३२ मीटर ते ७० मीटर उंचीच्या इमारतीलगत नऊ मीटर रुंदीचा रस्ता उभारण्याचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच ७० मीटर ते १२० मीटर उंचीच्या इमारतीलगत १२ मीटरचा, तर १२० मीटरहून अधिक उंचीच्या इमारतीलगत १८ मीटर रुंद रस्ता उभारणे बंधनकारक आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात निघेल, असे पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

नाताळच्या रोषणाईमुळे घात

सरगम इमारतीच्या ‘बी’ विंगमधील ११व्या मजल्यावर राहणाऱ्या मेघपुरिया कुटुंबाने नाताळनिमित्त घरी ‘ख्रिसमस ट्री’वर रोषणाई केली होती. त्यात शॉर्ट सर्किट झाले आणि सोफ्याने पेट घेतला. करण्याऐवजी घाबरलेल्या मेघपुरिया कुटुंबाने खालच्या मजल्यावर राहणाऱ्या शंकर लंके यांच्या घरी धाव घेतली. अग्निशमन दलाला कळवून वर येईपर्यंत आग समोरील गांगर कुटुंबीयांच्या जोड घरात पसरली होती. दिवाळीत गांगर यांनी संपूर्ण जोडघरात लाकडी फर्निचर बसवून घेतले होते. लाकडी फर्निचर पेटले आणि आग झटक्यात फोफावली. या घरात एसी कॉम्प्रेसर आणि दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आग बाराव्या मजल्यावर पसरली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

आग प्रतिबंधक यंत्रणा नावापुरती

मोकळे आवारही वाहनांमुळे चिंचोळे झाल्याने बंब जवळ न पोहोचल्याने त्यांचे फवारे योग्य उंची गाठू शकले नाहीत. ‘म्हाडा’कडून या इमारतीला अद्याप निवासी दाखला मिळालेला नाही. अग्निशमन दलाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र नाही. आग प्रतिबंधक यंत्रणा नावापुरती दिसते. रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार या यंत्रणा प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. ती उपलब्ध असती तर तिथल्या तिथे पाणी साठा आणि उंचीवर पाण्याची फवारणी करणाऱ्या वाहिन्या उपलब्ध होऊ  शकल्या असत्या.