सातत्याने लागणाऱ्या आगी तसेच पुरासारख्या इतर आपत्कालीन घटना, शहराच्या वाहतूक कोंडीतून घटनास्थळी पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाला लागणारा वेळ आणि या दरम्यान होणारी वित्त व जिवीत हानी लक्षात घेऊन सामान्य नागरिकांनाच अग्निशमन प्रतिबंधाचे प्रशिक्षण देण्याचा महानगरपालिकेने घेतलेला निर्णय प्रत्यक्षात आला आहे. या ४७६ प्रशिक्षित अग्निशमन स्वयंसेवकांच्या कामाचा श्रीगणेशा अनंतचतुर्दशीच्या विसर्जनानिमित्ताने होत आहे.

गेल्या वर्षभरात शहरात लागलेल्या मोठय़ा आगी व त्यातील हानीनंतर तिथे अग्निप्रतिबंधाचे योग्य नियम पाळले गेले नसल्याचे दिसून आले. शहराच्या रचनेमुळे अग्निशमन केंद्रातून मदत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता स्थानिकांनाच प्रशिक्षण देऊन प्राथमिक उपायांसाठी तयार करण्याच्या उद्दीष्टाने १५ ऑगस्ट रोजी अग्निसेवक कार्यकर्ते तयार करण्याची घोषणा पालिकेकडून करण्यात आली. त्यानंतर भायखळा येथील ३०, वडाळा येथील ५४, मरोळ येथील ७०, विक्रोळी येथील ६२ तर बोरीवली येथील २६० तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे ४७६ कार्यकर्ते गणेशविसर्जनादरम्यान पालिकेचा आपत्कालीन विभाग तसेच अग्निशमन दलाला मदत करणार आहेत. या कार्यकर्त्यांंमध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे.