मुंबईतील आगीचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. आज (सोमवार) सकाळी साडेसातच्या सुमारास कर्मवीर भाऊराव मार्गावर असलेल्या मुंबई सत्र न्यायालय परिसरात आग लागली. मुंबई सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे सांगण्यात येते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

ही लेव्हल २ ची आग असल्याचे सांगण्यात येते. सकाळची वेळ असल्यामुळे न्यायालय हे बंद होते. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही. आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, मुंबईतील अग्नितांडवाचे सत्र सुरुच आहे. रविवारीही कांजुरमार्गावरील सिनेव्हिस्टा स्टुडिओत लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला होता.  ४ जानेवारी रोजी अंधेरीत वातानुकूलन यंत्रामध्ये लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. मैमून मंजिल येथे ही घटना घडली होती. त्यापूर्वी २९ डिसेंबर रोजी कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह व मोजो ब्रिस्टो या पबमध्ये आग लागल्याने १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर १८ डिसेंबर रोजी साकीनाका भानू फरसाण मार्टमध्ये लागलेल्या आगीत १४ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता.