30 November 2020

News Flash

‘सिटी सेंटर’मध्ये अग्नितांडव

अग्निशमन दलाचे २४ बंब, १७ जम्बो टँकर, सहा पाण्याचे टँकर यांसह ५० अग्निविमोचन वाहने घटनास्थळी दाखल झाली होती.

(संग्रहित छायाचित्र)

 

मॉलमधील अनेक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी; पाच तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश

मुंबई : मुंबईमधील नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री लागलेल्या भीषण आगीने मध्यरात्रीपर्यंत अक्राळविक्राळ रूप धारण केले. मॉलच्या दुस ऱ्या-तिसऱ्यामजल्यावरील एकामागून एक दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडत होती. तब्बल पाच तासांहून अधिक काळ प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही आगीवर नियंत्रण मिळत नसल्यामुळे अखेर अग्निशमन दलाने ‘ब्रिगेड कॉल’ची घोषणा केली. आगीचे रौद्ररूप आणि धुमसणारा धूर यांमुळे अग्निशमनात अनेक अडथळे येत होते. आगीवर नियंत्रण मिळवताना एक उपअग्निशमन अधिकारी आणि चार जवान जखमी झाले.

नागपाडा परिसरातील मुंबई सेंट्रल बेस्ट बस आगारासमोरील सिटी सेंटर मॉलमधील दुसऱ्यामजल्यावर गुरुवारी रात्री ८.५३ च्या सुमारास आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. मात्र मॉलमधील मोबाइल, लॅपटॉप आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानांमध्ये आगीचा भडका उडत होता. दुसऱ्यामजल्यावरील आग तिसऱ्यामजल्यावर पोहोचली आणि आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले. धुराचे साम्राज्य अवघ्या मॉलमध्ये पसरू लागले होते. अखेर गुरुवारी मध्यरात्री २.४१ च्या सुमारास अग्निशमन दलाने ‘ब्रिगेड कॉल’ जाहीर केला.

क्षणाक्षणाला आगीचा भडका वाढू लागल्यामुळे अग्निशमन दलाची अधिक कुमक मागविण्यात आली. अग्निशमन दलाचे २४ बंब, १७ जम्बो टँकर, सहा पाण्याचे टँकर यांसह ५० अग्निविमोचन वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. प्रमुख अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्यासह एकूण २५० अधिकारी आणि अग्निशामक आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. अग्निशमन दलाच्या जवानांप्रमाणेच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमनात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पोलीस तैनात होते.

३५०० रहिवाशांची सुटका

सिटी सेंटर मॉलजवळच ‘ऑर्किड एन्क्लेव्ह’ ही ५५ मजली इमारत आहे. मॉलला लागलेली आग भडकू लागताच मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ उठू लागले. खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी ‘ऑर्किड एन्क्लेव्ह’मधील तब्बल तीन हजार ५०० रहिवाशांना सुरक्षितपणे इमारतीतून खाली उतरविले. काही रहिवासी आपल्या नातेवाईकांच्या घरी निघून गेले. तर काही रहिवाशांची जवळच्या मैदानात व्यवस्था करण्यात आली होती.

तीन मजली सिटी सेंटर मॉलमध्ये मोबाइल, प्रिंटर, स्टेशनरी, फर्निचर आदींची दुकाने आहेत. भेंडी बाजार परिसरातील मनीष मार्केटला आग लागल्यानंतर तेथील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने सिटी सेंटर मॉलमध्ये स्थलांतरित करण्यात आली होती. ‘मनीष मार्केट’प्रमाणेच या मॉललाही आग लागून मोठे नुकसान झाल्यामुळे दुकानदार हवालदिल झाले आहेत.

एक अधिकारी, चार जवान जखमी

सिटी सेंटर मॉलला लागलेली आग विझविताना अग्निशमन दलातील उपअग्निशमन अधिकारी गिरकर (५०), अग्निशामक रवींद्र प्रभाकर चौगुले (५३) जखमी झाले, तर शामराव बंजारा (३४), भाऊसाहेब बदाणे (२६), संदीप शिर्के  यांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे या दोघांनाही तात्काळ जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.

यंत्रणा अकार्यक्षम

आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाना नागपाड्यात धाव घेत सिटी सेंटर मॉलमध्ये लागलेली आग विझविण्याचे काम सुरू के ले. मात्र मॉलमधील अग्निप्रतिबंध यंत्रणा अकार्यक्षम असल्याचे अग्निशामकांच्या लक्षात आले. ही यंत्रणा कार्यान्वित असती तर तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले असते आणि मोठी हानी टळली असती, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइलच्या बॅटरीला लागलेली आग भडकली

सिटी सेंटर मॉलच्या दुसऱ्यामजल्यावरील एका दुकानातील मोबाइलच्या बॅटरीने पेट घेतला आणि काही क्षणात हा संपूर्ण मजला आगीच्या भक्ष्यस्थानी पडला, असा निष्कर्ष प्राथमिक पाहणीतून काढण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 12:47 am

Web Title: fire city center mall success to the fire brigade akp 94
Next Stories
1 दुकानांची राखरांगोळी, लाखोंचे नुकसान
2 वातानुकूलित उपनगरी गाडीच्या डब्याला आग
3 गर्भवती महिलेने फसवणूक केल्याने डॉक्टर करोनाबाधित
Just Now!
X