कागदपत्रे जळून खाक, मोठय़ा प्रमाणात वित्त हानी

मुंबई : माझगावमधील जीएसटी भवनमध्ये सोमवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. नवव्या मजल्यावर अचानक भडका उडाल्याने प्रचंड घबराट उडाली. या आगीत तीन मजले जळून खाक झाले. या इमारतीतील कर्मचाऱ्यांनी वेळीच बाहेर धाव घेतल्यामुळे ते बचावले, मात्र महत्त्वाची कागदपत्रे खाक झाली.

माझगावमध्ये शिवदास कापसी मार्गावर राज्य सरकारच्या जीएसटी भवनची दहा मजली इमारत आहे. या इमारतीत १२.३२ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेने कर्मचाऱ्यांना माहिती दिल्याने दोन ते सव्वादोन हजार कर्मचाऱ्यांना इमारतीबाहेर काढण्यात आले. नवव्या मजल्यावर भडका उडालेल्या आगीने आठव्या आणि दहाव्या मजल्याला वेढल्याने या ठिकाणचे साहित्य जळून खाक झाले. तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. अग्निशमन दलाच्या २० हून अधिक बंबांचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. शॉर्टसर्किटमुळेच आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

राज्य सरकारचे जीएसटी कार्यालय असलेल्या इमारतीत सुमारे साडेतीन हजार कर्मचारी काम करतात. या इमारतीचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. नवव्या मजल्यावर जिथे काम सुरू होते तिथेच आगीची ठिणगी पडली आणि ही आग आठव्या आणि दहाव्या मजल्यावरही पसरली. दरम्यान, नवव्या मजल्यावरील सुमारे अडीचशे कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपूर्वीच एमटीएनएल कार्यालयात हलवण्यात आले आहे. त्यामुळे आगीचा भडका उडाल्याच्या वेळी फायर अलार्म वाजताच उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांनी इमारतीबाहेर धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली.

आग लागल्यानंतर सर्व कर्मचारी आपला जीव वाचवण्यासाठी पळत असताना येथील एक  कर्मचारी कुणाल जाधव याने मात्र इमारतीच्या छतावर फडकत असलेल्या झेंडय़ाला वाचवण्यासाठी धाव घेतली. जिन्यावरून दहाव्या मजल्यावर जात त्याने झेंडा उतरवून तो खाली घेऊन आला.

आगीच्या घटनेबाबत समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील घटनास्थळी दाखल झाले. जीएसटी भवनमधील सगळ्या फाईल्स  संगणकात सुरक्षित असून काही फाईल जळाल्या असतील तर त्याचा आढावा घेतला जाईल , तसेच इमारतीचे संरचनात्मक व अग्निप्रतिबंधक तपासणी झाली होती का याचा आढावा घेऊन त्यानुसार कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, ही आग जाणून बुजून लावली असल्याचा आरोप पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. जीएसटी न भरणाऱ्यांची कागदीपत्रे जाळण्याचे हे कारस्थान असून याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.