मुंबईच्या अंधेरी परिसरातील एका व्यावसायिक इमारतीला शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. येथील लोखंडवाला परिसरामध्ये वीरा देसाई रोडवरील या इमारतीत अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत. दरम्यान, आज सकाळी कर्मचारी इमारतीमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सध्या अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांच्याकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, इमरतीतील सर्व कर्मचाऱ्यांना वेळीच बाहेर काढण्यात आल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याशिवाय, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.