News Flash

सहा वर्षांत २९ हजार अग्निप्रसंग!

३०० जणांचा मृत्यू, १२० अग्निशमन जवान जखमी

३०० जणांचा मृत्यू, १२० अग्निशमन जवान जखमी

गेल्या काही वर्षांमध्ये पुनर्विकासाच्या रेटय़ामध्ये मोठय़ा प्रमाणावर उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारती, इमारतींमधील सदोष अग्निसुरक्षा, निकृष्ट दर्जाची विद्युत उपकरणे आदी विविध कारणांमुळे गेल्या सहा वर्षांमध्ये मुंबईमध्ये तब्बल २९ हजार १४० आगीच्या दुर्घटना घडल्या असून त्यात तब्बल ३०० जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर ९२५ जण जखमी झाले. कर्तव्यावर असलेल्या अग्निशमन दलातील सात अधिकारी- अग्निशामक धारातीर्थी पडले, तर १२० जण जखमी झाले.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये मोठय़ा संख्येने टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र अनेक इमारतींमधील अग्निसुरक्षा व्यवस्था सदोष असल्याचे आगीच्या घटनांनंतर उघडकीस आले आहे. वाढत्या आगीच्या घटनांची दखल घेऊन पालिका प्रशासनाने इमारतींमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजनांच्या तपासणीची जबाबदारी अग्निशमन दलावर सोपविली आहे. मात्र अग्निशमन दलाने सुचविलेल्या सुधारणांची अंमलबजावणी इमारतीमध्ये करण्यात आली आहे की नाही याची खातरजमा करणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. आगीच्या घटना टाळता याव्या यासाठी इमारतींमधील रहिवाशांनी सावधपणे अग्निशमन दलाच्या सूचनांचे इमानेइतबारे पालन करणे गरजेचे आहे.

गेल्या सहा वर्षांमध्ये म्हणजे २०१२ पासून २०१८ या काळामध्ये मुंबईमध्ये तब्बल २९ हजार १४० आगीच्या घटना घडल्या आणि त्यात ३०० नागरिकांचे बळी गेले, तर ९२५ जण जखमी झाले. मृतांमध्ये १९६ पुरुष आणि ९७ महिलांचा समावेश होता. तर जखमींमध्ये ६३६ पुरुष आणि २८९ महिलांचा समावेश होता. या काळात आग विझविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे अग्निशमन दलातील सात जवान धारातीर्थी पडले, तर १२० अधिकारी-अग्निशामक जखमी झाले. माहितीचा अधिकार कार्यकर्ते आणि अधिकार फाउंडेशनचे पदाधिकारी शकील अहमत शेख यांनी माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत अग्निशमन दलाकडे अर्ज करून २०१२ पासून २०१८ पर्यंत मुंबईत आगीच्या किती घटना घडल्या, त्यात किती जणांचा मृत्यू झाला आणि किती जण जखमी झाले, मृत्यू आणि जखमींमध्ये नागरिक किती आणि अग्निशमन दलातील जवान किती याबाबच्या माहितीची विचारणा केली होती. अग्निशमन दलाकडून देण्यात आलेल्या माहितीनंतर गेल्या सहा वर्षांतील आगीच्या दुर्घटनांची आकडेवारी उघड झाली.

मुंबई अग्निशमन दलाकडून ‘महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजना अधिनियम २००६’ची अंमलबजावणी करण्यात येत नाही, असा आरोप शकील अहमद शेख यांनी केला आहे. या संदर्भात शेख यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता आणि प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांना पत्र पाठविले आहे. अग्निशमन दलाने ‘महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजना अधिनियम २००६’ची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 1:37 am

Web Title: fire in mumbai 2
Next Stories
1 अंदाज.. वाटे खरा असावा!
2 खड्डय़ात पडून चिमुकलीचा मृत्यू
3 तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Just Now!
X