५० ठिकाणी फटाक्यांमुळे आग

सर्वोच्च न्यायालयाच्या र्निबधामुळे फटाके वाजविण्याचे प्रमाण तुलनेत कमी झाले असले तरी निष्काळजीपणे फटाके वाजविल्याने लागलेल्या आगींत गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाली आहे. मागील वर्षी फटाक्यांमुळे ३७ आगीच्या दुर्घटना घडल्या होत्या. यंदा निष्काळजीपणे फटाके फोडल्याने ५० आगीच्या घटनांची नोंद झाली आहे.

यंदा न्यायालयाचे रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके फोडण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे कमी प्रमाणात फटाके फोडले गेले. ‘सफर’ आणि ‘आवाज फाऊंडेशन’ने केलेल्या पाहणीतही फटाके कमी फुटल्याचे आढळले. फटाक्यांचे प्रमाण घटले असले तरी आगीच्या दुर्घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. ६ ते १० नोव्हेंबर, २०१८ या पाच दिवसांच्या कालावधीत एकूण १९६ ठिकाणी आग लागली. त्यापैकी ५० दुर्घटना या फटाक्यांमुळेच लागल्याचे मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण केंद्रातील नोंदीवरून स्पष्ट होत आहे. या सर्व आगी होत्या. यातील एकही आग मोठय़ा स्वरूपातील नव्हती, असे अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी स्पष्ट केले आहे. दिवाळीत अग्निशमन दलाचे जवान नेहमीच सतर्क असतात. परंतु कुठेतरी एखादा जळका फटाका पडून आग लागू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.