वांद्रे (पश्चिम) येथील रेल्वे स्थानकाला खेटून असलेल्या शास्त्रीनगरमध्ये शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे वांद्रे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ वरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या आठ बंबांसह १९ गाडय़ा घटनास्थळी रवाना झाल्या. आगीमुळे वांद्रे रेल्वे स्थानकात एकच घबराट पसरली आणि प्रवाशी सैरावैरा पळू लागले. या गोंधळात एक प्रवासी रेल्वे गाडीखाली आला आणि ठार झाला.
पश्चिम रेल्वेवरील वांद्रे रेल्वे स्थानकालगत पश्चिमेला असलेल्या वांद्रे बस आगाराजवळील शास्त्री नगरमध्ये शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास भीषण आग लागली आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे ८ बंब, ८ पाण्याचे टँकर आणि ३ रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या. रेल्वे स्थानकाजवळच शास्त्री नगरमधील झोपडय़ांना आग लागल्यामुळे फलाट क्रमांक १ ला त्याची झळ बसली. आगीची झळ वांद्रे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ ला बसू लागताच प्रवाशांची धावपळ उडाली. काही प्रवाशांनी जीव वाचविण्यासाठी रेल्वे मार्गात उडय़ा मारुन पळण्याचा प्रयत्न केला. या धावपळीत रेल्वे गाडीखाली आलेला एक प्रवाशी ठार झाला. या आगीमुळे दादर ते माहीम रेल्वे स्थानकांदरम्यानची धिम्या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.
आगीने अक्राळविक्राळ स्वरुप घेतल्यानंतर धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरुन सोडण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आणि प्रवाशांना त्याचा फटका सहन करावा लागला.
  mu06