भांडुप पश्चिमेकडील एल.बी.एस. मार्गावरील ‘ड्रीम्स मॉल’मध्ये गुरुवारी मध्यरात्री आग लागल्याने तेथील करोना रुग्णालयातील १२ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

अग्निप्रतिबंधक अटींची पूर्तता न करताच मॉलमध्ये हे रुग्णालय उभारण्यात आले होते. या दुर्घटनेमुळे रुग्णालय आणि मॉलमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मॉलमध्ये रुग्णालय उभारण्यास परवानगी कशी दिली यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून महापौरांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

भांडुप येथील चारमजली ‘ड्रीम्स मॉल’च्या पहिल्या मजल्यावरील २०० चौरस मीटरच्या एका गाळ्यात गुरुवारी रात्री १२ वाजता आग लागली. याच मॉलमधील तिसऱ्या मजल्यावर करोना रुग्णालय सुरू करण्यात आले होते. आगीचे लोळ आणि धुराचे लोट तिसऱ्या मजल्यापर्यंत गेल्याने दहा करोना रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला, तर एका कृत्रिम श्वसनयंत्रणेवरील रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने १४ बंब, पाण्याचे दहा टँकर, दहा रुग्णवाहिकांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली. दरम्यानच्या काळात आगीने रौद्ररूप धारण के ले. मध्यरात्री पावणेदोन वाजता अग्निशमन दलाने या आगीचा स्तर चार क्रमांकाचा असल्याचे जाहीर के ले. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

आग लागल्यानंतर रुग्णालयातून अन्यत्र हलवण्यात आलेल्या ४६ पैकी ३० रुग्णांना मुलुंडच्या करोना उपचार केंद्रात, चौघांना भांडुपच्या फोर्टिस रुग्णालयात, दोघांना ठाण्याच्या विराज रुग्णालयात, दोघांना बीके सी करोना उपचार केंद्रात, एकाला टँकरोडच्या सारथी रुग्णालयात, पाच जणांना अग्रवाल रुग्णालयात दाखल केल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहारकर यांनी दिली. दोन रुग्ण आपल्या घरी गेले असून उर्वरित २२ रुग्ण बेपत्ता आहेत.

२२ करोना रुग्ण बेपत्ता

मॉलमधील या १०० खाटांच्या रुग्णालयात ७८ रुग्ण दाखल होते. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाने आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनी त्यांना अन्यत्र हलवले. त्यापैकी ४६ रुग्णांची माहिती पालिके कडे आहे, तर दहा मृतदेह सापडले आहेत. मात्र उर्वरित २२ रुग्णांचा पत्ता लागत नाही. त्यांच्यापासून करोनाच्या संसर्गाचा धोकाही आहे.

मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

मुंबई : भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून सर्व जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली. राज्यभरात मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये सुरू असलेल्या करोना उपचार केंद्रांमधील अग्निसुरक्षेची तत्काळ तपासणी करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

‘सरकार, महापालिका जबाबदार’

भांडुपमधील आगीची दुर्घटना राज्य सरकार आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे घडल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.  उच्च न्यायालयाने या दुर्घटनेची स्वत:हून दखल घेऊन राज्य सरकारला आदेश द्यावेत, अशी मागणी फडणवीस यांनी केली.