अंधेरीतील लोटस बिझनेस पार्कमध्ये लागलेली आग विझवण्यासाठी इमारतीत गेलेला अग्निशामक दलाचा एक जवान शुक्रवारी शहीद झाला. मुंबई महानगरपालिकेकडून शहीद जवानाच्या कुटुंबियांना १५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
इमारतीमध्ये अडकलेले अग्निशामक दलाचे सर्व अधिकारी आणि जवान यांना बाहेर काढण्यात यश आले परंतु, या घटनेत २१ जवान जखमी झाले आहेत. जखमींवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नितीन इवलेकर असे शहीद झालेल्या जवानाचे नाव असून, ते बोरिवली अग्निशामक दलामध्ये कार्यरत होते. इमारतीच्या छतावर अडकून पडलेल्या जवानांच्या सुटकेसाठी तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. हेलिकॉप्टरच्या साह्याने दोन जवानांना सुखरुपपणे इतरत्र हलविण्यात आले. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फोटो गॅलरी : अंधेरीतील लोटस बिझनेस पार्कमध्ये अग्नितांडव 
लोटस बिझनेस पार्क या इमारतीला शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारस भीषण आग लागली. इमारतीच्या २१ व्या मजल्यावर उपहारगृह असून, तिथे सुरुवातीला आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान तातडीने दाखल झाले. मात्र, इमारतीच्या एकदम वरच्या मजल्यावर आग लागल्याने ती विझवण्यात अडचणी येत होत्या. त्यानंतर भायखळा येथून उंचावरील आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचा अत्याधुनिक बंब मागविण्यात आला. या बंबाच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यास सुरुवात करण्यात आली. २१व्या मजल्यावरील आग आटोक्यात आणल्यानंतर अग्निशामक दलाचे सुमारे ११ अधिकारी आणि २२ जवान इमारतीत दाखल झाले. मात्र, त्यानंतर इमारतीच्या १३ व्या मजल्यावरून पुन्हा आगीचे लोट वर येऊ लागले. त्यामुळे अग्निशामक दलाचे जवान इमारतीत अडकून पडले. अडकलेल्या जवानांपैकी काही थेट इमारतीच्या टेरेसवर छतावर गेले. त्यानंतर अडकलेल्या जवानांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर घटनास्थळी काहीवेळ पाऊस पडल्याने आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा चालूच ठेवल्याने इमारतीतील आग आटोक्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे २१ हून अधिक बंब आणि पाण्याचे आठ टँकर दाखल झाले आहेत. या परिसरात दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारती आणि उंचावर लागलेली आग यामुळे मदतकार्यात अनेक अडथळे येत होते. अनेक व्यवसायिक इमारतींसाठी ओळखल्या जाणाऱ्या या भागात सकाळच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे वाहतूक कोंडीची परिस्थिती उदभवली होती. त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना इमारतीपर्यंत पोहचण्यासाठी बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत होते.