हॉटेल, दुकानांमध्ये नव्या साधनाचा अवलंब

गेल्या काही वर्षांमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून विविध त्रुटींमुळे अग्निप्रतिबंधक उपाययोजना कुचकामी ठरू लागल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर एका कंपनीने ‘अग्निरोधक चेंडू’ (फायरबॉल) तयार केला असून आगीच्या संपर्कात येताच हा चेंडू फुटून आगीला अटकाव करतो. मुंबईतील काही हॉटेल्समध्ये ‘अग्निरोधक चेंडू’ दिसू लागला आहे.

अनेक इमारतींमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजना म्हणून अग्निशामक उपकरणे बसवण्यात येतात. ठरावीक कालावधीनंतर या उपकरणांचे नूतनीकरण (रिचार्ज) करणे गरजेचे असते. परंतु काही इमारतींमधील रहिवासी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि इमारतीमध्ये बसविलेली उपकरणे केवळ दिखाव्यापुरतीच उरतात. हे अग्निप्रतिबंधक उपकरण आग लागल्यानंतर कसे हाताळायचे याची माहिती नसल्याने रहिवाशांकडून त्याचा वापर योग्यरीत्या होत नाही. याचाही अनेकदा फटका बसतो.

अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचा अभ्यास करून ऑटो फायर प्रोटेक्शन कंपनीने ‘मेक इन इंडिया’अंतर्गत ‘अग्निरोधक चेंडू’ बनविला आहे. तीनपैकी कोणत्याही श्रेणीतील वस्तूंमुळे लागलेली आग शमविता यावी या दृष्टीने हा चेंडू बनविण्यात आला आहे. आगीशी संपर्क आल्यानंतर हा चेंडू फुटतो आणि त्यातील वायूमुळे प्राणवायू आणि आगीमधील संपर्क तुटतो आणि आग शमण्यास मदत होते. उष्ण तापमानामुळे त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. तसेच त्यातून कोणताही विषारी वायू बाहेर पडत नाही. तीन घनमीटर क्षेत्रफळातील आग शमविण्याची क्षमता या चेंडूमध्ये आहे, असा दावा ऑटो प्रोटेक्शन कंपनीकडून करण्यात आला आहे.

पालिकेच्या ‘बी’ विभाग कार्यालयाने प्रायोगिक तत्त्वावर हा चेंडू खरेदी केला आहे. आगीची दुर्घटना घडल्यानंतर या चेंडूचा वापर कसा होऊ शकतो याचा अभ्यास पालिका पातळीवर सुरू आहे.

या चेंडूच्या हाताळणीसाठी कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नाही. अग्निप्रतिबंधक म्हणून त्याचा सहजगत्या वापर करता येतो. तसेच त्यातून कोणताही विषारी वायू बाहेर पडत नाही.

उदयकुमार शिरुरकर, साहाय्यक आयुक्त,

बीविभाग कार्यालय

रमजानमध्ये मिनारा मशिदीजवळ खाद्यपदार्थाचे अनेक स्टॉल्स उभारले जातात. मुंबईतील ठिकठिकाणांहून खवय्ये खद्यापदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे तेथे प्रचंड गर्दी होते. खवय्ये आणि विक्रेत्यांची सुरक्षा लक्षात घेऊन तेथील आपल्या स्टॉलमध्ये एक अग्निप्रतिबंधक चेंडू प्रायोगिक तत्त्वावर ठेवण्यात आला आहे. त्याचे फायदे लक्षात घेऊन आणखी चेंडू घेण्याचा आमचा विचार आहे.

जमाल शेख, ‘बडे मियास्टॉलधारक