११०३ पैकी २८२ इमारतींमध्ये अग्निसुरक्षाविषयक तपासणी

अग्निशमन दलाने विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन खासगी शाळा इमारतींची अग्निसुरक्षाविषयक तपासणी करण्याचे आदेश शाळा प्रशासनाला केले होते. मात्र मुंबईतील एक हजार १०३ खासगी शाळांपैकी केवळ २८२ शाळांनीच अग्निसुरक्षाविषयक तपासणी केल्याची खळबळजनक माहिती पालिका अधिकाऱ्यांनी शिक्षण समितीच्या मंगळवारच्या बैठकीत दिली. व्यवस्थापनाने शाळा इमारतीची अग्निसुरक्षाविषयक तपासणीच केली नसल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावरच आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईत आग लागण्याच्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन शाळा इमारतींमध्ये अग्निसुरक्षाविषयक तपासणी करून घ्यावी, अशी मागणी शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये  नगरसेवक करीत होते.

अग्निशमन दलामार्फत पालिका शाळांमध्ये अग्निसुरक्षाविषयक तपासणी सुरू करण्यात आली. तसेच अग्निसुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले बदलही शाळा इमारतीमध्ये करण्यात आले, अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त मिलीन सावंत यांनी मंगळवारी शिक्षण समितीच्या बैठकीत दिली. पालिका शाळांच्या ४४२ पैकी ३१९ इमारतींचे अग्निसुरक्षाविषयक तपासणी पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईमधील खासगी शाळांनी आपल्या इमारतीची अग्निसुरक्षाविषयक तपासणी करून घेण्याची सूचना नोव्हेंबरमध्ये करण्यात आली होती. अग्निसुरक्षाविषयक तपासणी करण्यासाठी खासगी शाळांना अग्निशमन दलाकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर अग्निशमन दलाकडून शाळा इमारतीची अग्निसुरक्षाविषयक तपासणी करण्यात येते. मुंबईतील सुमारे एक हजार १०३ पैकी २८२ खासगी शाळांच्या इमारतींची अग्निसुरक्षाविषयक तपासणी करण्यात आली आहे. उर्वरित शाळांना नियमानुसार नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.