अग्निशमन दलाच्या ना हरकत प्रमाणपत्राचा १५ वर्षांनी उलगडा

मुंबई : टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल झाली असली तरीही माटुंगा येथील अखिल भारतीय नाट्य परिषदेचे यशवंत नाट्य मंदिर अद्याप खुले झालेले नाही. गेली पंधरा वर्षे संकुलाला अग्नीसुरक्षेचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळाले नसल्याचा उलगडा नाट्य परिषदेच्या १६ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या बैठकीत अध्यक्ष कांबळी यांनी केला. हा मुद्दा विश्वस्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आला असून ‘अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळेपर्यंत नाट्यगृह सुरू करू नका,’ असे आदेश विश्वस्तांनी दिले आहेत. परिणामी यशवंत नाट्यगृहाच्या तिसऱ्या घंटेपुढे अग्निसुरक्षेचे आव्हान उभे राहिले आहे.

अखिल भारतीय नाट्य परिषदेने २००५मध्ये उभारलेल्या यशवंत नाट्य संकुलाला अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाण देण्यात आले नव्हते. तरीही गेली १५ वर्षे        परिषदेचा कारभार, नाट्यप्रयोग सुरळीत चालले होते. मंगळवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नाट्यगृह कधी खुले होणार याबाबत विचारणा झाली, त्यावेळी ‘याचे उत्तर देणे कठीण आहे. कारण नाट्यगृहाला अग्निशमन दलाने  ना हरकत प्रमाणपत्र नाकारले आहे. गेली पंधरा वर्ष त्या प्रमाणपत्राविना इथे कार्यक्रम होत होते. ही बाब २८ सप्टेंबरला आमच्यापुढे उघड झाली,’ असा खुलासा अध्यक्ष कांबळी यांनी केला.

परिषदेचे सदस्य आणि वास्तूविशारद तज्ज्ञ राजन भिसे यांनी इमारतीच्या दुरवस्थेची तपशीलवार मांडणी केली. ‘संकुलाच्या चारही बाजूला मोकळी जागा नाही असे नमूद करत अग्निशमन दलाने ना हरकत प्रमाणपत्र नाकारले आहे. इथे अग्निशमन यंत्रणा उपलब्ध असली तरी सध्या ती गंजलेल्या अवस्थेत आहे. जर एखादी दुर्घटना घडली तर मोठी हानी होऊ शकते,’ असे संकेत भिसे यांनी दिले.

अग्निशमन दलाच्या परवानगीविना नाट्यगृह सुरू ठेवणे कायदेशीर गुन्हा आहे. संस्थेचे विश्वास्त शरद पवार कृषी मंत्री असताना ते नाट्यगृहात आले होते. त्यावेळी केवळ एका दिवसाचे ना हरकत प्रमाणपत्र अग्नीशमन दलाने दिले होते. नाट्यगृहाचे वास्तुविशारद तज्ज्ञ आणि विश्वस्त असलेले शशी प्रभू कोणतीही परवानगी कुठूनही घेऊन येऊ शकतात. गोष्टी नियमात कशा बसवल्या जातात त्यांना ठाऊक आहे,’ असा टोला भिसे यांनी लगावला.

काही महिन्यांपूर्वी विश्वास्तांसोबत झालेल्या बैठकीत हे सर्व मुद्दे मांडण्यात आले. त्यावेळी नाट्यगृहाला अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही, तोवर नाट्यगृह बंद ठेवण्याच्या सूचना शरद पवार यांनी केल्या. तसेच लवकरात लवकर दुरुस्तीसंदर्भात शशी प्रभू यांनी पावले उचलावी, असेही सांगण्यात आले.

इतर  दुरवस्था

अग्नीशमन यंत्रणेसोबतच पाण्याचे पाइपही गंजले असल्याचे सांगण्यात आले. नाट्यगृहाची वातानुकूलित यंत्रणा मोडकळीस आली आहे. तसेच तळमजल्यावरील मुंबै बँकेत पाण्याची गळती होत असल्याची तक्रार बँकेने केली आहे.

नाट्यगृहाला ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले आहे. दरवर्षी त्यांचे नूतनीकरण करावे लागते. व्यवस्थापक सुनिल कदम यांना ही बाब माहीत आहे. अध्यक्ष माझ्यावर नको ते आरोप करीत आहेत. अग्नीशमन यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी साधारण २८ लाखांचा अहवाल खर्च मी दिला आहे. परंतु नाट्य परिषदच पुढाकार घेत नाही.   – शशी प्रभू, विश्वस्त