नौकेने गोदीत प्रवेश केल्याने दुर्घटना टळली

‘आयएनएस विराट’ या भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकेच्या बॉयलर रूममध्ये आग लागण्याची रविवारची दुर्घटना ही युद्धनौका गोव्याच्या नौदल गोदीत प्रवेशकर्ती झाल्यानंतर घडल्यामुळे मोठीच दुर्घटना टळली.

नौदल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आयएनएस विराट’ सध्या निवृत्तीच्या उंबरठय़ावर आहे. तब्बल २९ वर्षे भारतीय नौदलाच्या सेवेत तर एकूण ५७ वर्षे कार्यरत राहिलेल्या ‘आयएनएस विराट’बद्दल अनेकांना कुतूहल आहे. शिवाय ती येत्या जूनमध्ये निवृत्त होत असल्याने त्यानंतर तिच्यावर सफर करण्याची संधी मिळणार नाही. म्हणूनच रविवारी आयोजित  ‘डे अ‍ॅट सी’साठी नौसैनिकांचे कुटुंबीय मोठय़ा संख्येने विराटवर उपस्थित होते. बॉयलर रूममध्ये आग लागण्याची घडलेली दुर्घटना ही युद्धनौका भर समुद्रात असताना घडली असती तर पंचाईतच झाली असती. मात्र ही दुर्घटना युद्धनौका गोदीत प्रवेशकर्ती झाल्यानंतर घडल्याने मोठी दुर्घटना टळल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ‘डे अ‍ॅट सी’चे आयोजन नित्यनेमाने होत असले तरी रविवारच्या या सोहळ्यासाठी ‘आयएनएस विराट’ हे प्रमुख आकर्षण होते. या दुर्घटनेमध्ये धुराने गुदमरून चार जण जखमी झाले, त्यातील एकाला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्राण गमवावे लागले. अलीकडेच ‘आयएनएस विराट’ विशाखापट्टणम येथील आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनातही सहभागी झाली होती. त्यानंतर निवृत्तीपूर्व सत्रासाठी तिची रवानगी कोची शिपयार्डमध्ये करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्यावरील महत्त्वाच्या यंत्रणा काढून घेण्याचे काम तिथे पार पडले. या कामादरम्यान राहिलेल्या काही त्रुटींमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.