दिवाळी पाच दिवसांवर आली असताना मुंबई महापालिकेने फटाके फोडण्यावर बंदीचा निर्णय घेतला. फटाके विक्रीस मात्र मुभा असणार आहे. फटाक्यांवरील निर्बंधामुळे मागणीअभावी विक्रेत्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

करोना संसर्गाची दुसरी लाट येण्याच्या भीतीने यंदा दिवाळीमध्ये फटाके फोडण्यास बंदी घालण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. केवळ लक्ष्मीपूजनच्या दिवशी फुलबाजे आणि अनारसारख्या फटाक्यांना परवानगी देण्यात आली आहे. अन्य आवाजाच्या फटाक्यांवर बंदी असून, आदेश धुडकावून फटाक्यांची आतषबाजी करणाऱ्यांविरुद्ध पालिका आणि पोलिसांमार्फत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणीच नव्हे तर हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यावसायिक परिसर आदी ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत.

पालिकेने फटाक्यांच्या विक्रीवर मात्र कोणतेही निर्बंध घातलेले नाही. मात्र, बंदीमुळे मुंबई परिसरातील कोटय़वधी रुपयांच्या उलाढालीस फटका बसणार आहे. दिवाळी जवळ आल्याने गेल्या दोन आठवडय़ांपासून बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या आहेत. फटाक्यांच्या किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने सजवली. मुंबई आणि महानगर प्रदेशातील सर्वच किरकोळ विक्रेत्यांसह हंगामानुसार वस्तू विकणाऱ्यांनी घाऊक बाजारपेठेतून रविवापर्यंत फटाके खरेदी केले. आता ताज्या निर्बंधांमुळे मोठय़ा खरेदीदारांनी नोंदवलेली मागणी रद्द करण्यास सुरूवात केली आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.

पुणे आणि ठाण्यात निर्बंध

राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार हवेची गुणवत्ता कमी असलेल्या राज्यातील पुणे आणि ठाणे या दोन शहरांमध्ये फक्त पर्यावरणस्नेही (ग्रिन फटाके ) फटाक्यांची विक्री व ते फोडता येऊ शकतील.

हरित लवादाने दिलेला आदेश राज्यातील पुणे व ठाणे या दोन शहरांनाच लागू होतो, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. मुंबईसह राज्याच्या अन्य भागांमध्ये फटाक्यांची विक्री किंवा फटाके फोडण्यावर कोणतीही बंधने या आदेशाने लागू होत नाहीत. पुणे व ठाणे या दोन शहरांमधील हवेची पातळी किंवा गुणवत्ता हरित लवादाने निश्चित के लेल्या निकषांपेक्षा कमी आहे. यामुळे या दोन शहरांमध्येच निर्बंध येणार आहेत.

‘सॅनिटायझरचा वापर टाळा’

फटाके फोडण्यापूर्वी सॅनिटायझरचा वापर केलेला नाही, याची खात्री करून घ्यावी. सॅनिटायझर ज्वलनशील असण्याची शक्यता लक्षात घेऊन दिवाळीत शक्यतो त्याचा वापर टाळण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. घराबाहेर काढलेल्या रांगोळीशेजारी पाण्याने भरलेली बादली, साबण व हात पुसण्यासाठी सुती कापड ठेवावे. त्यामुळे पाहुण्यांना हात, पाय व तोंड स्वच्छ धुवून घरात येता येईल. परिणामी, करोनाचा संसर्ग टाळता येईल.

पालिकेच्या सूचना

* करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत कटाक्षाने गर्दी टाळावी. कौटुंबिक, सामाजिक कार्यक्रम टाळावेत. नातेवाईक अथवा परिचितांना प्रत्यक्ष भेटण्याऐवजी दूरध्वनी व दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्यात.

* भाऊबिजेच्या दिवशी बहिणीने भावाला दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून ओवाळावे, तसेच भावानेही ऑनलाईन पद्धतीने ओवाळणी द्यावी.

* एखाद्याच्या घरी जाण्याची वेळ आलीच तर तेथे मुखपट्टीचा वापर करावा.

* दिवाळीनिमित्त खरेदी करणे आवश्यक असल्यास घराबाहेर पडावे. मात्र गर्दी नसलेल्या ठिकाणी खरेदीला जावे.

मुंबईतील उलाढाल किती?

देशभरात दिवाळीसाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या फटाक्यांची निर्मिती होते. उत्पादक, घाऊक बाजारपेठ ते प्रत्यक्ष ग्राहकांच्या हाती फटाके पडेपर्यंत ही उलाढाल पाच हजार कोटींवर जाते. महाराष्ट्रात विशेषत: मुंबई महानगर प्रदेशात यातील दहा ते १५ टक्के म्हणजे ३०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होते, अशी माहिती उत्पादकांच्या संघटनेने दिली.

राष्ट्रीय हरीत लवादाने फटाक्यांची विक्री आणि फटाके वाजवण्यासंबंधी दिलेले आदेश प्राप्त झाले असले तरी राज्य सरकार जे निर्देश देईल त्यांचे तंतोतंत पालन केले जाईल. राज्य सरकारच्या निर्देशांवर ठाणे महापालिका त्यासंबंधी पुढील कार्यवाई करेल.

– विपीन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका