News Flash

तपासचक्र : दहशतीसाठी गोळीबार

एव्हरार्ड नगरमधील त्रिमूर्ती सोसायटीतील मिस्त्री पॅलेसमध्ये अरिहंत बिल्डर्सचे ऑफिस आहे.

शीवमधील एव्हरार्ड नगर परिसर म्हणजे अतिशय शांत आणि सुरक्षित ठिकाण. पण, ५ फेब्रुवारी २०१६ च्या सायंकाळी गोळीबाराच्या आवाजाने या शांततेला छेद दिला. अरिहंत बिल्डर्सच्या कार्यालयात गोळीबार झाल्याचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा गोळीबार कुणा व्यक्तीला लक्ष्य करून केला होता की यामागे दहशत पसरवणे हा हेतू होता, असे दोन प्रश्न पोलिसांसमोर होते. पण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने समांतर तपास करत यामागील रहस्य अवघ्या ११ दिवसांत उलगडले.
एव्हरार्ड नगरमधील त्रिमूर्ती सोसायटीतील मिस्त्री पॅलेसमध्ये अरिहंत बिल्डर्सचे ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये ५ फेब्रुवारी २०१६ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या आसपास दोन बुरखाधारी व्यक्तींनी प्रवेश केला. त्यातील एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. दोनदा गोळीबार केल्यानंतर दोन्ही बुरखाधारी व्यक्ती पळून जात असल्याचे चित्रीकरण ऑफिसमधील सीसीटीव्हीमध्ये झाले होते. गोळीबारात जिनेश जैन (३०) हे जैन बिल्डर्सच्या मुलाला खांदा आणि पाठीला गोळ्या लागल्या. गंभीर अवस्थेत जिनेश यांना शीव रुग्णालयात दाखल केले. शीवसारख्या परिसरात झालेल्या गोळीबाराने केवळ बिल्डर विश्वात नाही तर सर्वसामान्यांनाही हादरा बसला होता.
चुनाभट्टी पोलीस आणि गुन्हे शाखा या गोळीबाराचा तपास करण्यात गुंतली होती. गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक आणि मोटारवाहन चोरी विरोधी पथकाच्या चार टीम तयार करण्यात आल्या. पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. त्यावेळी पहिला प्रश्न साहजिकच कोणी खंडणीसाठी हा प्रयत्न केला आहे का, हा समोर आला. जैन यांनी आपल्याला कुणीही खंडणीसाठी फोन केला नसल्याचे तसेच गेल्या अनेक वर्षांत कुणाशीही कुठल्याच विषयांवर वाद झाला नसल्याचे सांगितले. पोलिसांनी सखोल चौकशी करत त्यांचे आíथक व्यवहार, त्यांच्या विविध विकासप्रकल्पात भागीदार असलेल्या व्यक्ती यांच्याविषयी माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यातून पुढे आलेल्या २५ व्यक्तींकडे जाऊन या पथकांनी माहिती घेतली. मात्र, त्यातील कुणीही गोळीबार घडवून आणल्याची शक्यता वाटत नव्हती. त्यानंतर परिसरातील गुन्हेगारांची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला, पण सध्या पत्नीच्या बाळंतपणासाठी पॅरोलवर असूनही घरी नसलेल्या सुमीत येरुणकर ऊर्फ पप्पू याविषयी खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वस्त यांना मिळाली. त्यांनी आपल्या पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पप्पूविषयी माहिती काढण्यास सांगितले.
सुमीतने २०११ मध्ये दोन खून केले होते. त्यासाठी तो कल्याणच्या आधारवाडी तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. पॅरोलवर सुटल्यानंतर त्याने जैन यांची भेट घेऊन त्यांच्या चुनाभट्टीच्या प्रकल्पाला रेती पुरविण्याचे कंत्राट मिळावे अशी मागणी केली. त्यावेळी जैन यांनी होकार दिला. मात्र सुमीत जेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी सुमीतला काम न देताच बांधकामाला सुरुवात केली. सुमीतला ही माहिती जेलमध्ये मिळाली. डिसेंबर २०१५ मध्ये पत्नीच्या बाळंतपणाचे कारण पुढे करून तीन महिन्यांचा पॅरोल मिळवला बाहेर आला होता. पण सुमीत बेपत्ता होता. पोलिसांनी त्याच्या घरी काम करणाऱ्या स्वयंपाक्याला चौकशीसाठी बोलवले. त्याच्याकडून महत्त्वाचा तपशील हाती लागला. गेल्या काही महिन्यांपासून जैन यांचे ऑफिस असलेल्या इमारतीत सुमीतने एक फ्लॅट भाडय़ाने घेतला होता. त्या घरात तीन व्यक्तींचे वास्तव्य होते. एकदा साफसफाई करताना आपल्याला त्या घराच्या खाटेखाली दोन रिव्हॉल्व्हर दिसल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. या माहितीच्या आधारे सुमीतनेच हा सर्व प्रकार केला असावा, या पोलिसांच्या संशयाला बळ मिळाले. त्यांनी आपल्या खबऱ्यांमार्फत सुमीत आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यास सुरुवात केली. अशातच एके दिवशी सुमीत व त्याचे साथीदार कल्याण पश्चिमेकडील दीपक हॉटेल येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यानुसार सापळा रचून सुमीतसह अजय करोसी (२७), विनोद विश्वकर्मा (२८), बाबुकुमार गुप्ता (२१) यांना अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तुले, १८ काडतुसे आणि सव्वा लाख रुपये हस्तगत करण्यात आले.
तुरुंगात राहून रेती व्यवसायात जम बसविलेल्या सुमीतला बांधकाम व्यवसायातही आपले हातपाय पसरायचे होते. म्हणून त्याने जैनकडे काम मागितले पण त्यांनी नकार देताच सुमीतने जैनला धडा शिकविण्याचे ठरविले. कल्याण तुरुंगातच ओळख झालेल्या अजय करोसी याची त्याने यासाठी निवड केली. अजयने त्याचा मित्र विनोद विश्वकर्मा आणि बाबू गुप्ता यांना कामासाठी आणले. डिसेंबर २०१५ मध्ये पॅरोलवर सुटल्यानंतर जैन यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचे ऑफिस असलेल्या इमारतीतच त्यांनी एक फ्लॅट भाडय़ाने घेतला. तिथूनच ऑफिसमध्ये ये-जा करणाऱ्या जैन यांच्यावर लक्ष ठेवण्यास त्यांनी सुरुवात केली. ३ फेब्रुवारीला त्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र ऑफिसमध्ये गर्दी असल्याने तो प्रयत्न फसला. दुसऱ्या दिवशीही गर्दी असल्याने हल्ला न करता ते मागे फिरले. मात्र, ५ फेब्रुवारीच्या रात्री ऑफिसमध्ये दोनच व्यक्ती बसल्याचे पाहून अजय आणि विनोद यांनी गोळीबार केला. त्यानंतर बाबूने दोघांनाही ऑफिसबाहेरून गाडीत बसवून तिथून पळ काढला होता. पण पोलिसांनी कौशल्याने धाग्याला धागा जुळवून त्यांचा माग काढला. खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वस्त, निरीक्षक जगदीश साईल, विनायक मेर, संजीव धुमाळ, सचिन कदम, साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष नाटकर यांनी या तपासकामात महत्त्वाची भूमिका बजावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2016 5:21 am

Web Title: firing for terror
टॅग : Firing
Next Stories
1 मालवणीत दिराकडून भावजयीची हत्या
2 बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यास न्यायालयाचा नकार
3 भुजबळांना आणखी एक धक्का
Just Now!
X