गोवंडी शिवाजी नगर ,बैंगणवाडी रोड नं ७ येथे एका स्थानिक गुंडावर मोटरसायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी गोळीबार करून पळ काढला.या गोळीबारात जखमी झालेल्या पप्पु कालीया याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहे . ही घटना शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीसांनी दोन अनोळखी इसमांविरुध्द हत्येचा प्रयत्न केल्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वीज चोरी प्रकरणातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे .
मोहम्मद रज्जाक युनुस शेख उर्फ पप्पु कालीया असे जखमी गुंडाचे नाव आहे. गोवंडी शिवाजी नगर येथे राहणारा कालीया याच्यावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हयांची नोंद आहे. वीज चोरी करून झोपडपट्टीत पुरवण्याचा अनधिकृत व्यवसाय करणारा कालीया शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता बैगणवाडी रोड नं७ येथून मोटरसायकलवरून जात असतांना मोटरसायकलवरून आलेल्या दोन इसमांपैकी मागे बसलेल्या एकाने कालीयावर रिव्हॉल्वरमधून एक गोळी झाडून अंधारातून पळ काढला.