मुंबईतील चेंबूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या सभेत गोळीबार झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार संजय दिना पाटील यांनी हा गोळीबार केल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. मात्र या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

मंगळवारी संध्याकाळी चेंबूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता. या मेळाव्यात पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिकही उपस्थित होते. या दरम्यान सात ते आठ बंदुकधारी आणि तलवारधारी तरुण सभेत घुसले. या तरुणांनी गोळीबार केला. गोळीबार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील नेते आणि माजी खासदार संजय दिना पाटील आणि त्यांचे समर्थक होते असा आरोप मलिक यांनी केला आहे. याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करु असे मलिक यांनी सांगितले. संजय दिना पाटील यांच्या हातात बंदूक होती असा दावाही त्यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना केला. संजय दिना पाटील यांना पक्षातून काढले नाही तर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरेल असे मलिक यांनी सांगितले.  या घटनेत काही कार्यकर्ते जखमी झाल्याचे वृत्त वाहिन्यांनी दिले आहे. संजय दिना पाटील हे माजी खासदार असून  ते राष्ट्रवादीचे मुंबईतील माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. मलिक आणि पाटील हे दोघेही ईशान्य मुंबईतील नेते असून मलिक यांचे ते विरोधक म्हणून ओळखले जातात.

मी मेळाव्यात गेलो असता माझ्यावर हल्ला झाला असा आरोप संजय दिना पाटील यांनी केला आहे. गोळीबाराची कोणतीही घटना घडली नाही. हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत असे पाटील म्हणालेत. माझ्याकडे पिस्तूलचा परवाना आहे. स्वसंरक्षणासाठी मी रिव्हॉल्वर बाहेर काढली तर गैर काय असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या सभेत गोळीबाराची घटना घडल्याने पक्ष अडचणीत सापडला आहे. विशेष म्हणजे पक्षाच्याच नेत्यावर गोळीबाराचा आरोप होत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षांतर्गत वाद पक्षाला महागात पडेल अशी चर्चाही आता रंगू लागली आहे.