News Flash

फुलपाखरांच्या मराठी नावाचे पहिले पुस्तक

राज्य जैवविविधता मंडळाचा उपक्रम

(संग्रहित छायाचित्र)

कैक वर्षांपासून केवळ इंग्रजी नावांनीच ओळखल्या जाणाऱ्या फुलपाखरांना अखेरीस मराठी नावे मिळाली असून त्याचे सचित्र पुस्तक राज्य जैवविविधता मंडळाने प्रकाशित केले आहे. या पुस्तकामुळे २७७ फुलपाखरांचे प्रथमच मराठी नामकरण झाले आहे.

शनिवारी वन भवन, पुणे येथे राज्याच्या वन विभागाचे प्रधान सचिव विकास खर्गे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. राज्यात आढळणाऱ्या २७७ फुलपाखरांची रंगीत छायाचित्रे, इंग्रजी नाव, मराठी नाव आणि थोडक्यात माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. यापूर्वी फुलपाखरांना केवळ इंग्रजी नावानेच ओळखले जायचे, पण ही उणीव आता जैवविविधता मंडळाच्या या पुस्तकामुळे दूर झाली आहे. फुलपाखरांना मराठी नावे देणारे महाराष्ट्र हे देशातील दुसरे राज्य असून, यापूर्वी केरळ राज्याने फुलपाखरांना स्थानिक नावे दिली आहेत. या कार्यक्रमास मंडळाचे सदस्य सचिव जीत सिंह आणि नामकरण समितीचे सदस्य उपस्थित होते.

पक्षी, प्राणी यांच्यासाठी मराठी नावं असली तरी फुलपाखरांची ओळख मात्र इंग्रजी नावानेच होती. इंग्रज आमदनीत निसर्गप्रेमी अशा काही इंग्रज अधिकाऱ्यांनी भारतातील फुलपाखरांना कमांडर, सार्जन्ट, कार्पोरल अशी नावेदेखील दिली होती. पुढे या क्षेत्रातील अभ्यासकांनी इंग्रजी नावे दिली. मराठी साहित्यात किंवा ग्रामीण पातळीवरदेखील फुलपाखरांसाठी विशिष्ट नावे नव्हती.

डॉ. राजू कसंबे यांच्या फुलपाखरांवरील मराठी पुस्तकात ८० फुलपाखरांना मराठी नावं देण्यात आली होती. त्यामुळे जैवविधिता मंडळाने काही महिन्यांपूर्वी सर्वच फुलपाखरांच्या मराठी नावांसाठी अभ्यासक आणि पर्यावरणप्रेमी संस्थांना आवाहन केले होते.

राज्यभरातून अनेक अभ्यासकांनी आणि २५ संस्थांनी यामध्ये भाग घेतला. त्यानंतर जैवविविधता मंडळाने त्याचे संकलन करून अंतिम नावे ठरवली आणि पुस्तिका प्रकाशित केली. यापुढे नीलायम, भिरभिरी, पवळ्या, रूपमाला, रुईकर, झिंगोरी, झुडपी, हबशी, हळदीकुंकू, ढवळ्या, भटक्या अशा विविध नावांनी ही फुलपाखरं ओळखली जातील.

या पुस्तकात सहा कुळांमध्ये २७७ फुलपाखरांची विभागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर या कुळांचेदेखील मराठी रूपांतर करण्यात आले. मुग्धपंखी (Riodinidae) कुंचलपाद (Nymphaliade) चपळ (Hesperiidae), निल  (Lycaenidae), पितश्वेत (Pieridae) आणि पुच्छ (Papiliondae) अशा सहा कुळांमध्ये सर्व फुलपाखरांचे वर्गीकरण केले आहे. जैवविधिता मंडळातर्फे मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. जयंत वडतकर, हेमंत ओगले, दिवाकर ठोंबरे, डॉ. राजू कसंबे आणि अभय उजागरे यांच्या समितीने फुलपाखरांच्या मराठी नावांना अंतिम रूप दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 1:18 am

Web Title: first book of marathi called butterflies abn 97
Next Stories
1 भाजपची सत्ता येणार हा फडणवीसांचा शब्द
2 शिवसेनेचा असहकार व पवारांबद्दलच्या सहानुभूतीचा फटका!
3 पीएमसी बँक घोटाळा, माजी भाजपा आमदाराच्या मुलाला अटक
Just Now!
X