‘दिल्लीतील पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच आहे, या अण्णा हजारे यांच्या मताशी आपण सहमत आहोत,’ असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळल्याने भाजपमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. युतीमध्ये थंडावलेला कलगीतुऱ्याचा फड मंगळवारी पुन्हा रंगला. शिवसेनेने हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हान मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी दिले आहे.  
‘लाटेपेक्षा सुनामी मोठी असते, हे जनतेने दाखवून दिले’ या ठाकरेंच्या टोमण्याने भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. प्रचंड पैसा, सुमारे १२० खासदार, केंद्रीय मंत्री व अन्य राजकीय नेत्यांसह सर्वानी ताकद पणाला लावली आणि पंतप्रधानांच्याही सभा झाल्या, तरीही भाजपची धूळधाण झाली. जनतेला भाजपने गृहीत धरू नये, असे स्पष्ट करीत दबावापुढे न झुकता मतदान केल्याबद्दल दिल्लीतील जनतेचे कौतुक करावे तितके थोडे असल्याचे सांगत ठाकरे यांनी ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले. शेवटी जनता सर्वोच्च आहे, पण ती सध्या अस्वस्थ आहे, हे भाजपने लक्षात घ्यावे, असा परखड सल्लाही ठाकरे यांनी दिला. केजरीवाल यांनी शपथविधी समारंभाचे आमंत्रण दिल्यास आपण नक्की जाऊ, असेही ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, दिल्लीच्या निकालाचा धडा घेऊनच आता पावले टाकावी लागतील, असे एका ज्येष्ठ भाजप नेत्याने स्पष्ट केले.

दुसऱ्यावर आलेल्या सुनामीमुळे आनंदी होणाऱ्यांबद्दल आम्हाला आनंदच आहे.     
– रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष