लॅपटॉप, फोन सुविधेसह वेगळी आसनव्यवस्था

सार्वजनिक प्रवासाची व्याख्या बदलणाऱ्या मेट्रोमध्ये यापुढे प्रथम श्रेणीचा वेगळा डबा देण्याचा विचार सुरू आहे. या महिन्याअखेर एमएमआरडीएकडून मेट्रो डब्यांसाठी निविदा काढण्यात येणार असून त्यात प्रथम श्रेणीच्या डब्यासाठी वेगळी रचना ठेवण्याचा मुद्दा अंतर्भूत असेल. भविष्यात मुंबई महानगर परिसरातील सर्वच मेट्रो मार्गावर प्रथम श्रेणीचा डबा दिला जाईल.

मुंबईच्या लोकलमध्ये प्रथम व द्वितीय श्रेणीचे वेगळे डबे आहेत. थंडगार आणि आरामशीर प्रवासाचा अनुभव देणाऱ्या मेट्रोमध्ये सर्वाना एकसमान डब्यांची सुविधा उपलब्ध आहे. वर्सोवा – घाटकोपर मार्गावर चार डब्यांची गाडी चालवण्यात येत असून त्यात अर्धा डबा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. मात्र सध्या शहरात १२७ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम सुरू असून त्यांच्यासह भविष्यातील सर्व नव्या मार्गावर मेट्रोमधील एक डबा प्रथम श्रेणीसाठी राखीव ठेवण्यात येईल, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शहराच्या रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट यामागे आहे. कारमधून जाणारे व्यावसायिक प्रवासाच्या वेळेत लॅपटॉप, फोन वापरून काम करतात. यामुळे प्रथम श्रेणीच्या डब्यात बसण्यासाठी खात्रीशीर जागा दिली तर ते मेट्रोचा पर्याय स्वीकारतील. लॅपटॉप व फोनचा वापर करण्यासाठी सुविधा देण्याच्या दृष्टीने या डब्याची रचना केली जाणार  आहे, असे एमएमआरडीएचे अधिकारी म्हणाले.

दिल्ली मेट्रोमध्ये प्रथम श्रेणीच्या डब्यांची सुविधा नाही. त्याचप्रमाणे चेन्नईमध्येही हा पर्याय फारसा स्वीकारला गेला नाही. मात्र दिल्ली, बंगलोर, कोलकाता किंवा चेन्नईपेक्षा मुंबईची स्थिती वेगळी आहे. येथे सार्वजनिक वाहतुकीने प्रवास केला जातो. त्यामुळे त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार नाहीत. मेट्रोच्या सर्व मार्गावरून तब्बल एक कोटीपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली जाईल. त्यामुळे प्रथम श्रेणीच्या डब्यांनाही चांगला प्रतिसाद मिळेल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना वाटते. वेगळ्या रचनेच्या प्रथम श्रेणी डब्याला तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. एकच वेगळा रचनेचा डबा देण्यासाठी कंपन्या तयार होतील का, बसण्याची व्यवस्था कशी असेल, मेट्रोमध्ये तिकीट तपासनीस नसल्याने घुसखोरी कशी थांबवावी असे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यावर विचार करून त्यानुसार पुढील उपाय योजना केली जाणार आहे.

स्वतंत्र महिला डबा?

वर्सोवा- घाटकोपर मार्गावरील मेट्रोमध्ये चार डब्यांची गाडी चालवण्यात येत असून त्यात अर्धा डब्बा महिलांसाठी आरक्षित ठेवला जातो. मात्र डब्यांची संख्या वाढवल्यावर महिलांसाठी संपूर्ण डब्बा आरक्षित ठेवण्याचा विचार केला जाऊ शकतो.

अन्य मेट्रोतील परिस्थिती

* चेन्नई मेट्रोमध्ये २०१६ मध्ये प्रथम श्रेणीच्या डब्याची सुविधा देण्यात आली. या डब्याचे तिकीट सामान्य श्रेणीपेक्षा दुप्पट ठेवले गेले. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

* दिल्लीमध्ये महिलांसाठी विशेष डब्याची सोय असली तरी प्रथम डब्याची सुविधा नाही. कोलकाता मेट्रोमध्येही प्रथम श्रेणीचा डबा नाही.