मुंबईतील नऊ केंद्रांवर ४० कक्ष कार्यरत; पहिल्या टप्प्यात ६० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

मुंबई : करोना लसीकरणाच्या पहिल्या दिवशी शहरात चार हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार असून यासाठी नऊ केंद्रांवर ४० कक्ष सज्ज करण्यात येणार आहेत. उपलब्ध लशींमधून ६० हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे शक्य असल्याने त्यानुसार पालिकेकडून नियोजन केले जात आहे.

करोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील लसीकरणाची सुरुवात शनिवारपासून सुरू होणार असून मुंबईतील कूपर, नायर, केईएम, लोकमान्य टिळक रुग्णालय या प्रमुख रुग्णालयांसह वांद्रे-कुर्ला संकुलातील करोना आरोग्य केंद्र, वांद्रे भाभा रुग्णालय, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालय, कांदिवलीचे शताब्दी रुग्णालय आणि घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय या नऊ केंद्रांवर एकूण ४० कक्षांमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी एका पाळीत लसीकरण केले जाणार असून एका कक्षात १०० याप्रमाणे चार हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

मुंबईत आतापर्यंत सुमारे १ लाख ३० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून दोन मात्रेप्रमाणे पुरेसा साठा सध्या नाही. त्यामुळे सध्या ६० हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या सत्रांचे नियोजन करण्यात येत आहे. उर्वरित ७० हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी आणखी सुमारे दीड लाख कुप्यांची आवश्यकता आहे, असे डॉ. गोमारे यांनी स्पष्ट के ले.

मुंबईतील कूपर रुग्णालयात शनिवारी लसीकरणाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले जाणार आहे. पंतप्रधानांना संवाद साधण्यासाठी येथे एका मोठ्या स्क्रीनसह सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रात आठ कक्षांची सुविधा केलेली आहे. एका कक्षात १०० याप्रमाणे या केंद्रावर एका वेळी ८०० कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तीला कोणत्या कंपनीची लस देण्यात येणार आहे. पहिल्या मात्रेनंतर दुसरी मात्रा कधी घ्यायची, तसेच नंतर काही त्रास जाणवल्यास जवळील लसीकरण केंद्रात जाण्याच्या सूचना दिल्या जातील. लसीकरण केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला अर्धा तास देखरेखीखाली ठेवले जाणार असून ८० जणांची क्षमता असलेला देखरेख कक्षाची व्यवस्था आहे. लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तीची नोंदणी, ओळख पटविणे, पहिली मात्रा दिल्याची नोंद, दुष्परिणाम झाल्याचे आढळल्यास त्याच्या नोंदी अशी संपूूर्ण प्रक्रिया कोविन अ‍ॅपवर अवलंबून आहे. यासाठी दोन टॅब दिलेले आहेत. लसीकरणाच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पुन्हा एकदा शुक्रवारी सकाळी सराव फेरी घेतली जाईल, अशी माहिती कूपर रुग्णालयातील सामाजिक औषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अनिता शेनॉय यांनी दिली.

सहा केंद्रांवर अद्याप अ‍ॅप अनुपलब्ध

कूपर, राजावाडी आणि वांद्रे-कु र्ला संकु ल या तीन केंद्रांवर सराव फेरी झाली असून शुक्रवारी उर्वरित सहा केंद्रांवर त्यांच्या पातळीवर फेरी आयोजित करण्याची सूचना दिलेली आहे, असे डॉ. गोमारे यांनी सांगितले. परंतु प्रत्यक्षात केंद्रांना याबाबत कोणत्याही ठोस सूचना आलेल्या नाहीत. आमच्याकडे सहा केंद्र तयार आहेत; परंतु लसीकरणाच्या वेळी वापरायचे अ‍ॅप अद्याप दिलेले नाही. तसेच सराव फेरी घेण्याबाबत कळविलेले नाही, असे कांदिवली शताब्दी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रतिमा पाटील यांनी सांगितले. याचप्रमाणे व्ही. एन. देसाई, वांद्रे भाभा या रुग्णालयांसह नायर, केईएम आणि लो. टिळक रुग्णालयांमध्येही सराव फेरीबाबत आदेश प्राप्त झाले नसून अजून तरी अ‍ॅप दिलेले नाही, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.