‘शोले’ या चित्रपटाशी प्रत्येकाची अशी एक वेगळी आठवण जोडली गेली आहे. या चित्रपटाने फक्त कलाविश्वातच नव्हे तर, विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्यांनाही प्रेरित केलं आहे. याचच एक उदाहरण म्हणजे बंगळुरूचा अरूण वर्मा. हे नाव गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बरंच चर्चेत आलं आहे. अरुणचं नाव चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्याची बार्बेक्यू राइड.

अरुण वर्मा आणि त्याच्या मोठय़ा भावाने थेट त्यांच्या बुलेटला ‘बार्बेक्यू बाइक’चा अनोखा टच दिला आहे. ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ हे गाणं अनेकांच्याच आवडीचं आहे. त्याच गाण्यापासून आणि ‘शोले’ या चित्रपटापासून प्रेरित होत या भावांच्या जोडीने एक नवा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. व्यवस्थापकीय शिक्षणाचा फायदा घेत अरुण आणि त्याच्या भावाने ‘बार्बेक्यू राइड’ सुरू केली. हैदराबाद, बंगळुरु, चेन्नई, या ठिकाणी दोन चाकांवर स्वॅगमध्ये येणारी ही बार्बेक्यू राइड रस्त्याच्या कडेला उभी केल्यावर तिच्याकडे वळून पाहणाऱ्यांची संख्या फारच मोठी असते. अशी ही राइड आता थेट मुंबईतही सुरु झाली आहे.

डोंबिवली पूर्वेला दर्शन वाडकर याने मुंबईच्या बार्बेक्यू राइडची धुरा आपल्या खांद्यावर घेतली असून, मोठ्या दिमाखात त्याची ही बुलेट सर्वांच्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी उभी आहे. ड्रमस्टीक्सपासून ते पनीरपर्यंत अशा निवडक मेन्यूसह ही राइड मुंबईकरांच्या भेटीला आली आहे. येत्या काळात या शहराची चव पाहता दर्शन मासे, कोळंबी अशा पदार्थांनाही बार्बेक्यूचा टच देणार आहे.

VIDEO : अशी होती प्रवासवेड्या मित्राची अनोखी विश्वभ्रमंती

मसाले, चिकन, कोळसा आणि गरजेची सर्व सामग्री ठेवण्यासाठी या राइडमध्ये सर्व व्यवस्था करण्यात आली असून, ज्या पद्धतीने ही बार्बेक्यू राइड डिझाइन करण्यात आली आहे, ती खरंच खूप वाखाणण्याजोगी आहे. मिलिटरी ग्रीन (बॉटल ग्रीन) या रंगाचा वापर करत एक वेगळाच रॉ लूक देण्यात आलेली ही बुलेट रस्त्याने जातानासुद्धा अनेकजण तिच्याकडे वळून वळून पाहण्यास भाग पडतात. तर मग फार वेळ न दवडता तुम्हीही एखाद्या वीकेंडला या बार्बेक्यू राइडला नक्की भेट द्या.