ठाण्यात रंगणार बासरी सिंफनी
बासरीवादनातील महर्षी पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या नावाने राष्ट्रीय स्तरावर सुरू करण्यात आलेल्या ‘पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया पुरस्कारा’चा पहिला मान ज्येष्ठ बासरीवादक डॉ. एन. रामाणी यांना मिळाला आहे. ठाण्याच्या ‘गुरुकुल प्रतिष्ठान’तर्फे देण्यात येणार हा पुरस्कार येत्या १९ व २० जानेवारी रोजी होत असलेल्या सहाव्या ‘बासरी उत्सवा’त पंडितजींच्याच हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
देशभरात होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या महोत्सवांमध्ये बासरीसाठी केवळ एक ठरावीक काळ दिला जातो. पण बासरीला केंद्रस्थानी ठेवून महोत्सव आयोजित केला जात नाही. हा विचार डोक्यात ठेवूनच ठाण्यातील ज्येष्ठ बासरीवादक विवेक सोनार यांनी पाच वर्षांपूर्वी गुरुकुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून बासरी उत्सव सुरू केला. विवेक सोनार हे स्वत: पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य आहेत. या उत्सवात बासरी आणि इतर वाद्यांची सांगड कशी घातली जाऊ शकते, याकडे आम्ही कटाक्षाने लक्ष देतो, असे ते म्हणाले.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून आम्ही ‘बासरी सिंफनी’ हा नवीन प्रकार सुरू केला. यात ६०-७० बासरीवादक एकत्र एकाच वेळी इतर वाद्यांसह सुरावट सादर करतात. यात गिटार, सॅक्सोफोन, तबला, ड्रम, कीबोर्ड अशा अन्य वाद्यांचाही समावेश असतो. गेल्या वेळी एका रंगमंचावर तब्बल १०० बासरीवादक आणि इतर वादक यांनी एकत्रपणे सिंफनी सादर केली. संपूर्ण जगात असा प्रकार केवळ आम्हीच केला आहे, असाही दावा सोनार यांनी केला. पं. चौरसिया यांच्या नावाने दिला जाणारा हा पहिलाच पुरस्कार असेल. या महोत्सवात सॅक्सोफोन व बासरी यांची जुगलबंदी, बासरीला केंद्रस्थानी ठेवून कथ्थक नृत्य असे कार्यक्रम होणार आहेत. ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात शनिवार व रविवारी अनुक्रमे सायंकाळी ७ व ८ वाजल्यापासून बासरी उत्सव होईल.